पवईत उच्चभ्रू इमारतीत चोराने मारला मोठा डल्ला

मोठा डल्लापवईतील लेक फ्रंट सॉलीटेअर इमारतीत एका चोरट्याने घरफोडी करत मोठा डल्ला मारल्याची घटना सोमवार, २० जुलै रोजी घडली आहे. इमारतीच्या ५व्या मजल्यावर असणाऱ्या ५०२ फ्लॅटमधून चोरट्याने ९ लाख २५ हजाराचे सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने आणि रोकडीवर हात साफ केला आहे. चोरीला गेलेल्या मालमत्तेची नोंद घेणे सुरु असून, हा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. विशेष म्हणजे घरात लोक असताना चोरट्याने हा डाव साधला आहे. याच इमारतीच्या दुसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर असणाऱ्या फ्लॅटमध्ये सुद्धा चोरट्याने प्रवेश केला होता.

कोरोनामुळे करण्यात आलेले लॉकडाऊन आता हळूहळू शिथिल झाले असले तरी अजूनही काही लोक घराबाहेर निघणे टाळत आहेत. लोक आपल्या घरातच असल्याने या काळात चोरीचे प्रमाणात सुद्धा घट झाली आहे. मात्र पवईतील पवई तलावाच्या समोर असणाऱ्या लेक फ्रंट सॉलीटेअर इमारतीत एका चोरट्याने प्रवेश करत लोक घरात असतानाच तब्बल ३ फ्लॅटमध्ये प्रवेश करून त्यातील एका फ्लॅटमध्ये चोरी करत मोठा डल्ला मारला आहे.

आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही घटनास्थळी दाखल झालो असता कोणताही दरवाजा उचकटल्याशिवाय घरात प्रवेश करत चोरी केली असल्याचे समोर येत आहे. रात्री २.३० नंतर सकाळी ७ वाजण्यापूर्वी चोरट्याने आपला डाव साधलेला आहे. यावेळी घरातील सर्व व्यक्ती बेडरूममध्ये झोपलेले होते, असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

पाईपवरून चढून घरात प्रवेश

“चोरट्याने पाईपच्या माध्यमातून खिडकीतून किचनमार्गे घरात प्रवेश केला आहे. संपूर्ण फ्लॅटमधील लोकांचा अंदाज घेत ज्या रूममध्ये कोणीच नाही तिथे चोरट्याने मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला आहे.” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांच्या अधिकाऱ्याने सांगितले.

“घरातील व्यक्तीचे जवाब नोंदवण्याचे काम सुरु असून, प्रथमदर्शनी ९.२५ लाख रुपयांचे दागिने आणि रोकड चोरट्याने चोरल्याची माहिती समोर येत आहे”, असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दळवी यांनी सांगितले.

“५व्या मजल्यावरील ५०२ फ्लॅटमधील एका बेडरूममध्ये कपाटाच्या आत असणारे लॉकर चोरट्याने उचकटत त्यातील सोन्याचे, हिऱ्याचे दागिने चोरी केले आहेत. विशेष म्हणजे त्याने घरातील इतर कोणत्याच गोष्टीला हात लावलेला नाही. केवळ दागिने आणि २५,०००ची रोकड चोरी केली आहे.’ असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या तपासी अधिकाऱ्याने सांगितले.

“इमारतीच्या २रया आणि ४थ्या मजल्यावर त्याच रांगेत असणाऱ्या फ्लॅटमध्ये सुद्धा चोरट्याने प्रवेश केला होता. मात्र तिथे काहीच चोरी केली नसल्याचे फ्लॅटमालकांनी सांगितले,” असे याबाबत बोलताना पोलीस उपनिरीक्षक रोकडे यांनी सांगितले.

मोठा डल्लाफोरेन्सिक पथकाने तपासणी केली असता ५ व्या माळ्यावरील फ्लॅटमध्ये ३ ठसे तर ४ थ्या माळ्यावरील फ्लॅटमध्ये २ ठिकाणी १ आणि ३ असे ४ ठसे मिळून आले आहेत. श्वान पथकही चोरीच्या ठिकाणी दाखल झाले होते.

इमारतीची सुरक्षा भिंत चढून चोरट्याने इमारत भागात प्रवेश केला आहे. त्यानंतर पाईपच्या सहाय्याने त्याने २, ४ आणि ५ माळ्यावरील एकाच रांगेतील फ्लॅटमध्ये खिडकीतून प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे एका फ्लॅटमध्ये तर चक्क त्याच घरातील व्यक्तीचा ऍपल कंपनीचा मोबाईल फोनच्या टोर्चचा उपयोग त्याने केला आहे. जाताना मोबाईल परत जागेवर सोडून गेला आहे,” असेही याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.

चोर हा इमारतीत प्रवेश करताना कोणतेही सामान घेवून आलेला दिसत नाही. मात्र जाताना त्याने चोरीच्या ठिकाणावरील एका लॅपटॉप बॅगमधून लॅपटॉप काढून ठेवून त्यात चोरी केलेले दागिने भरून घेवून गेला आहे.

आम्हाला चोरट्याचे सीसीटीव्ही फुटेज मिळून आले आहे. सध्या त्याची ओळख पटवण्याचे काम सुरु असून, खबऱ्याचे जाळे पसरवण्यात आले असून, चोरटा लवकरच पोलिसांच्या ताब्यात असणार आहे, असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.

 

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!