बृहन्मुंबई महानगरपालिका ‘एस’ विभागातील विविध क्वारंटाईन सेंटरमधील लोकांना पुरवण्यात येणारे अन्न अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाचे येत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. मात्र रविवारी तर क्वारंटाईन सेंटरमधील या नागरिकांवर उपासमारीची वेळ आली. पवई आणि कर्वेनगर येथील इमारतींमधील क्वारंटाईन सेंटरमधील जवळपास २००० नागरिकांवर रविवारी उपाशी राहण्याची वेळ आली. संध्याकाळी ४ पर्यंत जेवण आले नसल्याने संतप्त नागरिकांनी इमारतीखाली उतरून तेथील कर्मचाऱ्यांना घेराव घातला. अखेर काहीच उत्तर मिळाले नसल्याने नागरिकांनी ऑनलाईन जेवण मागवल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड सुद्धा सहन करावा लागला.
गेल्या काही दिवसांपासून खराब जेवण येत असल्याने सेंटरला जेवण पुरवणारा कंत्राटदार बदलण्यात आला होता. मात्र नवा कंत्राटदार असलेल्या महिला बचत गटाला पहिल्याच दिवशी जेवण पुरवण्यात सपशेल अपयश आले. त्यामुळे क्वारंटाईन सेंटरमधील नागरिकांचे मात्र हाल झाले.
पवईतील हिरानंदानी येथील एमटीएनएल ट्रेनिंग सेंटरच्या मागे असलेल्या इमारतींमध्ये क्वारंटाईन सेंटर उभारण्यात आले आहे. तसेच कर्वेनगर येथील एका इमारतीत सुद्धा अलगीकरण केंद्र तयार करण्यात आले असून, एस वार्डमधील पवई, भांडूप, विक्रोळी, कांजूरमार्ग या भागातील नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. या इमारतींमध्ये २००० पेक्षा अधिक नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. या अलगीकरणात असणाऱ्या नागरिकांना जेवण, नाष्टा आणि पाणी सुद्धा वेळेवर मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी येथील नागरिकांकडून होत आहेत.
रविवारी सकाळी सुद्धा येथील काही लोकांना नाष्टा पोहचला तर काहींना पोहचलाच नाही. परंतु दुपारच्या जेवणावेळी मात्र कहरच झाला, दुपारी चार वाजले तरी जेवणच पोहचले नव्हते. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी इमारतीमधून बाहेर येत सेंटरवरील कर्मचाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला. काहींनी क्वारंटाईन सेंटर प्रमुखाला धारेवर धरले. मात्र त्यांच्याकडून ही समाधानकारक उत्तर मिळाले नाही.
काही सामजिक कार्यकर्त्यांना याची माहिती मिळाली असता त्यांनी सेंटरमधील लहान मुले, मधुमेहग्रस्तांसाठी तातडीने बिस्किटांची व्यवस्था केली.
मात्र उशीर झाला तरी जेवणच न आल्याने येथील लोकांनी इमारतीखाली गर्दी केल्याने सोशल डिस्टनसिंगचाही फज्जा उडाला. जेवणच आले नसल्याची माहिती मिळाल्याने जेवणाची वाट पाहून थकलेल्या लोकांपैकी ज्यांच्याकडे पैसे होते त्यांनी अखेर ऑनलाईन जेवण मागवले. ज्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला. मात्र काहींच्याकडे तेही नसल्याने त्यांना रविवारी उपासमारीची वेळ आली.
“जेवण पुरवण्याचे काम रविवारपासून एका महिला बचत गटाला दिले होते. पण त्यांना ते जमले नाही. लोकांना तातडीने जेवण पुरवण्याची आम्ही व्यवस्था केली” – संतोषकुमार धोंडे, सहायक आयुक्त, एस वार्ड, मुंबई महानगरपालिका
“नागरिकांच्या आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या दबावानंतर उशिरा जेवण पोहचले खरे, पण ते जेवणही लोकांनी खाल्ले नाही. जेवणात एकच चपाती देण्यात आली होती, ती सुद्धा कच्चीच होती. डाळीचे प्रमाण खूपच कमी होते. भात व्यवस्थित शिजला नव्हता भाजीत मीठ अधिक झाले होते. त्यामुळे असे अर्धकच्च्चे जेवण खावून आपली प्रकृती बिघडवून घेण्यापेक्षा ते न खाणेच लोकांनी पसंद केले.” असे याबाबत बोलताना कर्वेनगर सेंटरमधील नागरिकांनी सांगितले.
“आमच्या सेन्टरमध्ये मोठ्या प्रमाणात लोक आहेत. त्यांच्यासाठी ६ वाजता जेवण सेन्टरवर पोहचते मात्र ते जेवण आमच्यापर्यंत पोहचायला ८ ते ९ वाजतात. सेन्टरवरील कर्मचारी निर्धास्त असतात त्यांना काहीच पडलेली नसते. समाधानकारक उत्तरे त्यांच्याकडून मिळत नाहीत.” असे याबाबत बोलताना पवईतील अलगीकरण केंद्रातील नागरिकांनी सांगितले.
आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.
No comments yet.