नागरिकांनी सहकार्य न केल्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढला – डॉ. विलास मोहकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी ( एस विभाग)
अवि हजारे: एस विभाग हद्दीमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एस विभाग कोरोना बाधितांच्या यादीत ५व्या क्रमांकावर पोहचला आहे. ही वाढती लोकसंख्या विचारात घेता राजकारणी आणि नागरिक प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. मात्र, एस विभागाने आपण पूर्णपणे ग्राउंड लेव्हलवर काम करत असून, रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत असे स्पष्ट केले. नागरिकांच्या असहकार्यामुळेच कोरोनाचा प्रसार विभागात वाढत असल्याची खंत एस विभागाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विलास मोहकर यांनी याबाबत आवर्तन पवईशी बोलताना व्यक्त केली.
त्यांनी याबाबत बोलताना सांगितले की, एस विभागात आतापर्यंत ३८ मेडिकल कॅम्प घेतले गेले आहेत. यापुढेही अधिकाधिक तपासण्या करून रुग्णसंख्या आटोक्यात आणण्याचा आपला मानस आहे.
भांडूप धारावीच्या वाटेवर! अशा आशयाच्या बातम्या सोशल माध्यमातून प्रसारित करण्यात येत आहेत. त्याचे खंडन करत मोहकर म्हणाले, “एस विभाग प्रशासन पूर्ण सक्षमपणे या लढाईत उतरले आहे. येणाऱ्या काळात कठोरपणे पाऊले उचलण्याची आमची तयारी आहे. संपूर्ण विभाग लवकरात लवकर नियंत्रणात आणला जाईल.”
विलगीकरण कक्षातील समस्या – तक्रारीबद्दल विचारले असता ते म्हणाले की, “एका क्वारंटाईन सेंटरमध्ये हजारो लोकं राहत आहेत. त्यांना काही समस्या येत आहेत. मागील काळात त्यांना दिले जाणारे जेवण निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार आम्हाला मिळाली होती. आम्ही तात्काळ त्याची दखल घेत कंत्राटदार बदलून सेवा पूर्ववत केली आहे. आमच्या निदर्शनात समस्या येतील तशा आम्ही त्यांचे निवारण करत आहोत.”
सध्या एस विभाग काही भागात पुन्हा ५ जुलै पर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र नागरिक त्याला अजिबात जुमानत नसल्याचे निदर्शनास येत आहे. पोलिसांच्या सहाय्याने विभागात राऊंड होत आहेत. मात्र आम्ही पुढे जाताच फेरीवाले पुन्हा जागेवर येवून बसत आहेत आणि लोकांची खरेदीसाठी झुंबड उडत आहे. नागरिक प्रशासनाने नियोजित केलेल्या नियमावलीला धाब्यावर बसवत असल्यामुळे प्रसार रोखणे आवाहनात्मक होवून बसले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जनजागृती बरोबरच अधिकाधिक कठोरपणे नियम पाळणार असल्याचेही यावेळी बोलताना डॉ. विलास मोहकर यांनी सांगितले.
आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.
No comments yet.