चांदिवलीला हिरानंदानी कॉम्प्लेक्सला जोडणाऱ्या पंचसृष्टी कॉम्प्लेक्स मार्गे जाणाऱ्या मार्गावर असणाऱ्या आयआयटी स्टाफ कॉटर्स रोडच्या सिमेंटीकरण कामाचा नारळ रविवार, ४ जूनला फोडण्यात आला. पंचसृष्टी कॉ. ऑप. हौ. सोसायटी फेडरेशनच्या सततच्या पाठपुराव्यानंतर आमदार दिलीप मामा लांडे यांच्या प्रयत्नातून अखेर या कामाला सुरुवात होत आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका ‘एस’ विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या आयआयटी स्टाफ कॉटर्स ते भग्तानी क्रीशांग पर्यंतच्या रस्त्याच्या सिमेंटीकरणाचे काम यावेळी करण्यात येणार आहे.
यावेळी स्थानिक आमदार दिलीप मामा लांडे, पंचसृष्टी कॉ. हौ. सोसायटी फेडरेशन अध्यक्ष इंद्रनील चटर्जी, फेडरेशनचे पदाधिकारी, शाखाप्रमुख शिवा सूर्यवंशी, उपशाखाप्रमुख धनेश जाधव, अनिल भदरगे हिरानंदानी रहिवासी संघटनेचे संजय तिवारी आणि मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.
पंचसृष्टी कॉम्प्लेक्स मार्गे जाणारा हा रस्ता हिरानंदानी आणि चांदिवलीला जोडणारा एक महत्वाचा दुवा आहे. मात्र पालिका, म्हाडा, विकासक यांच्या कैचीत अडकून पडल्याने हा रस्ता गेली दीड दशके अत्यंत दुरावस्थेत होता. यासंदर्भात पंचसृष्टी कॉ. ऑप. हौ. सोसायटी फेडरेशन विकासक, पालिका, नगरसेवक, आमदार आणि खासदार सर्वांचे दरवाजे ठोठावत होते. मात्र सर्वांनीच याकडे दुर्लक्ष केले होते. अखेर मे २०२२ ला आमदार लांडे यांच्या प्रयत्नातून गुंडेचा हिल क्रीशांग पर्यंतच्या रस्त्याच्या सिमेंटीकरणाचे काम करण्यात आले.
या रस्त्याच्या कामामुळे स्थानिक रहिवाशांसह या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र आयआयटी स्टाफ कॉटर्सबाहेरील पालिका ‘एस’ विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या भागात रस्त्यावर भलेमोठे खड्डे, आणि चढउतार निर्माण झाल्याने दुरावस्था झाली होती. वाहनांचे मोठे नुकसान होत, अपघात घडत होते.
“फेडरेशनच्या निर्मितीपासून या रस्त्यांच्या निर्मितीसाठी आम्ही पालिका आणि लोकप्रतिनिधी सर्वांकडे पाठपुरावा करत होतो. रस्त्यांच्या दुरावस्था पाहता नागरिकांच्या सुविधेसाठी फेडरेशन या संपूर्ण रस्त्याच्या डागडुजीचे काम पाहत होते. मात्र केवळ डागडुजी करून प्रश्न मिटणार नव्हता म्हणून आम्ही आमदारांकडे आमच्या समस्या घेवून गेलो असता त्यांनी आम्हाला हा संपूर्ण रस्ता बनवण्याचे आश्वासन दिले होते. त्यातील पहिला टप्पा पूर्ण झाला असून, दुसऱ्या टप्प्यात आता आयआयटी स्टाफ कॉटर्ससमोरील सर्वात त्रासदायक पट्ट्याचे काम आज सुरु होत आहे,” असे यासंदर्भात बोलताना फेडरेशनचे अध्यक्ष इंद्रनील चटर्जी यांनी सांगितले.
वाहतूक राहणार बंद
रविवार रात्रीपासून या कामाची सुरुवात होणार असून, पावसाळ्यापूर्वी सिमेंटीकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न असणार आहे. या कामासाठी तात्पुरता हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. संपूर्ण वाहतूक डीपी रोड ९ वरून वळवण्यात आली आहे. “लेकहोम फेडरेशनला आम्ही त्या परिसरातून हलक्या वाहनांना जावून देण्याची विनंती केली आहे,” असे पंचसृष्टी कॉ. ऑप. हौ. सोसायटी फेडरेशनच्यावतीने सांगण्यात आले.
No comments yet.