मुंबईतील खराब रस्त्यांच्या यादीत डीपी रोड हा सर्वात वरच्या स्थानावर आहे – चांदिवली सिटिझन्स वेल्फेअर असोसिएशन
जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड (जेवीएलआर) आणि चांदिवलीला जोडणाऱ्या ‘डीपी रोड ९’च्या दयनीय अवस्थेमुळे हताश होत आणि पालिकेच्या चालढकल कारभाराने उदासीन झालेल्या चांदिवलीकरांनी या खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यांवरून वाहन चालविण्याच्या धाडसासाठी वाहनचालकांचा सत्कार केला आहे. चांदिवली सिटीझन्स वेल्फेअर असोसिएशन (सिसिडब्ल्यूए) तर्फे वाहनचालकांचा सन्मान करण्यात आला.
रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळून ६ महिन्यापेक्षा जास्त काळ उलटून गेला तरी या रस्त्याचे काम तर दूरच या रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम देखील पालिकेने पावसाळ्यापूर्वी केले नसल्याने प्रवाशांना खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागत आहे. याच त्रासाला कंटाळून चांदिवलीकरांनी या मार्गातून आपला राग व्यक्त करत अनोखे आंदोलन केले आहे.
“चांदिवली परिसरात राहणारे हजारो रहिवाशी दररोज आपल्या कामावर जाण्या-येण्यासाठी डीपी रोड ९चा वापर करत असतात. चांदिवलीपासून – जेविएलआरपर्यंत जाण्यासाठी या ५ ते १० मिनिटांचा वेळ हा पुष्कळ असतो. मात्र, रस्त्यावर पडलेले खड्डे, दुतर्फा झालेले अतिक्रमण आणि रस्त्यावर उभी राहणारी वाहने यातून मार्ग काढत जवळपास अर्धा ते पाऊण तास वाहनचालक येथे अडकून पडत असतात,” असे यासंदर्भात बोलताना चांदिवलीकर म्हणाले.
१७ फेब्रुवारीला स्थानिक आमदार दिलीप मामा लांडे यांच्या प्रयत्नातून डीपी रोड ९च्या शुभारंभाचा नारळ फोडण्यात आला होता. लवकरच या रोडच्या कामाला सुरुवात करत असल्याचे पालिका अधिकाऱ्यांच्यावतीने यावेळी बोलण्यात आले होते. मात्र चांदिवली जंक्शनपासून १०० फूट अंतराच्या गटाराच्या कामाव्यतिरिक्त कसलेच काम ४ महिन्यात झालेले नाही.
चांदिवली सिटिझन्स वेल्फेअर असोसिएशनचे संस्थापक सदस्य मनदीप सिंग मक्कर म्हणाले, “हा खड्डेमय रस्ता वापरण्यासाठी हिंमत लागते. नियोजित ९० फुट रस्ता कुठेच दिसत नाही. अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनी फेब्रुवारीमध्ये आम्हाला सांगितले होते की, एका महिन्यात ९० फूट रस्त्याचे काम सुरू होईल, परंतु जुलैपर्यंत काहीही झाले नाही. त्यामुळेच आम्ही नागरिकांचा या खडतर मार्गातून दररोज प्रवास करून दाखवलेल्या शौर्याबद्दल सन्मान केला.”
ते पुढे म्हणाले, “मुंबईतील सर्वात खराब रस्त्याच्या प्रथम स्थानावर हा रस्ता येतो. डीपी रोड ९च्या निर्मितीच्या कामाचा नारळ फोडत लोकप्रतिनिधीमध्ये याच्या कामाचे श्रेय घेण्याची चढाओढ लागलेली होती. मग या दुरावस्थेचे आणि नागरिकांच्या त्रासाचे श्रेय कोणाचे? ते देखील या लोकप्रतिनिधींचे आहे. हा प्रश्न सुटला नाही तर १५ ऑगस्टला आम्ही उपोषणाला बसू.”
परिसरातील आणखी एक रहिवाशाने यासंदर्भात बोलताना सांगितले की, फेब्रुवारी महिन्यात आम्ही जेविएलआरला जोडणाऱ्या ९० फुटी आणखी एका पर्यायी मार्गासाठी आंदोलन केले होते. मात्र तो रस्ता फक्त कागदांवर आणि पालिकेच्या कार्यालयातच घुटमळत आहे. प्रत्यक्षात आमच्या वाटणीला फक्त हा ‘रस्त्यांवर खड्डे, कि खड्ड्यात रस्ता’ म्हणवणार अतिक्रमणयुक्त रस्ताच आहे.
“या मार्गावरून चालत गेले तरी ७ ते ८ मिनिटात माणूस जेविएलआरपर्यंत पोहचू शकतो. मात्र खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यासोबतच, गॅरेजसारख्या अतिक्रमणांमुळे रस्ता अरुंद झाला आहे. मुंबईमध्ये फुटपाथवर अतिक्रमण होते मात्र चांदिवलीत फुटपाथ सोबतच अर्ध्या रस्त्यावर अतिक्रमण झाले आहे. अतिक्रमण हटवून डीपी रोड ९ खड्डेमुक्त झाल्यास प्रवासाचा हा वेळ निम्म्यावर येईल. परंतु त्यावर अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही,” असे मनदीप सिंग म्हणाले.
No comments yet.