पालिका ‘एस’ विभागाच्या टोकावर मानल्या जाणाऱ्या रामबाग परिसरात संपूर्ण पावसाळा संपला तरी पालिकेतर्फे नालेसफाई झाली नव्हती. याबाबत स्थानिक रहिवाशी ऑलिव डिसुजा यांनी केलेल्या तक्रारीकडे आवर्तन पवईने लक्ष वेधल्यानंतर स्थानिक शाखाप्रमुख सचिन मदने यांनी त्वरित धडपड करून मंगळवारी पालिकेच्या माध्यमातून येथील नाले सफाईचे काम करून घेतले.
प्रत्येक वर्षी पावसाळा पूर्व पालिकेतर्फे मुंबईत रस्ते दुरुस्ती, नाले सफाई सारख्या कामांना केले जाते. मात्र यावर्षी कोरोनाच्या सावटाखाली असणाऱ्या मुंबईत पालिकेतर्फे काही ठिकाणी ही नालेसफाई झालीच नाही. यापैकीच एक परिसर म्हणजे रामबाग पवई येथील म्हाडा सोसायटी.
रामबाग म्हाडा परिसरात काही सरकारी, निम सरकारी आणि खाजगी इमारतीत मिळून जवळपास ४५०० लोक राहतात. इतर कॉम्प्लेक्स प्रमाणे या कॉम्प्लेक्सचे सुद्धा आपले एक अस्तित्व आहे. मात्र २ पालिका विभागाच्या हद्दीच्या रेषेवर असणाऱ्या या भागात स्थानिक प्रतिनिधी आणि प्रशासन यांच्याकडून कायम दुर्लक्षच केले जाते. येथील नागरिक हे नेहमीच नागरी सुविधेसाठी पालिकेकडे आणि स्थानिक प्रतिनिधींकडे पाठपुरावा करताना पहायला मिळतात. मात्र त्यांचा संघर्ष संपत नाही.
पाठीमागील अनेक महिन्यांपासून येथील नागरिक परिसरातील नालेसफाई, परिसरात टाकण्यात येणारा कचरा, अवैद्य पार्किंग अशा समस्यांसाठी पालिका आणि पोलीस प्रशासन यांच्याकडे पाठपुरावा करत आहेत. मात्र प्रशासन आश्वासन आणि टोलवाटोलवी शिवाय काहीच करत नसल्याची तक्रार येथील स्थानिक नागरिक करत आहेत. येथील समस्यांचा नागरिकांच्यावतीने स्थानिक नागरिक ऑलिव डिसुजा नियमित पाठपुरावा करत होत्या. १८ सप्टेंबर रोजी ऑलिव यांनी हीच समस्या ट्वीट करत प्रशासनाच्या निदर्शनास आणले होते. या ट्वीटमध्ये स्थानिक नगरसेविका वैशाली पाटील, नामनिर्देशित नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी आणि शाखा १२२ चे शाखाप्रमुख सचिन मदने यांना टॅग करत याकडे लक्ष वेधले होते.
“दुसऱ्याच दिवशी मदने यांनी आमच्या समस्येची पाहणी करून अधिकाऱ्यांशी फोनवर बोलत लवकरच काम सुरु होईल असे सांगितले होते. अखेर मंगळवारी पालिकेच्या कर्मचाऱ्यांसोबत येवून त्यांनी येथील नालेसफाई करून घेतली आहे,” असे याबाबत बोलताना स्थानिक नागरिकांनी सांगितले.
No comments yet.