आपले कर्तव्य बजावत असताना मुंबई पोलिसांवर हात उचलणाऱ्या व्यक्तीला सोडून देण्याची फोनवरून मागणी करणारे आमदार राम कदम यांच्यावर गुन्हा नोंद करून कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी केली आहे.
पवईतील हिरानंदानी भागात अपघात करून महिलेसोबत वाद घालणाऱ्या ३ तरुणांना पवई पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असणारे पोलीस शिपाई नितीन खैरमोडे हे रिक्षातून पोलीस ठाण्यात घेवून येत असताना तरुणांनी हल्ला करून खैरमोडे यांना जखमी केले होते. या संदर्भात पवई पोलिसांनी २ अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेतले असून, मुख्य आरोपी दिपू तिवारी हा फरार आहे.
भाजपा सरकार सत्तेत आल्यापासून दिन-दलित, मुस्लिम, पिडीत, महिला, विद्यार्थी व आदिवासी जनतेवर अन्यायाची मोहीम चालू आहे. गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून संविधानाची पायमल्ली होत आहे. कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. पोलिसांचा धाक कमी होऊन पोलिसांवरच हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा हल्ले करणारे गुंड भाजपा पक्षाचे असल्याचे निष्पन्न होत आहे. पवई पोलीस ठाण्यातील पोलीस शिपायावर हल्ला करून त्याला जखमी करणाऱ्या आपल्या कार्यकर्त्याला सोडवण्यासाठी फोन करणाऱ्या आमदार राम कदम यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून, कारवाई करावी, अशी मागणी माकणीकर यांनी केली आहे.
पोलिसावर झालेला हल्ला हा पोलीस यंत्रणेवर हल्ला आहे, अश्या गुंडांवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी आरपीआय डेमोक्रॅटिक पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे. पोलिस शिपायावर हल्ला केलेल्या सत्तेचा माज चढलेल्या भाजपा कार्यकर्त्याला माणुसकीच्या दृष्टीने सोडून द्यावे, असा फोन करणाऱ्या आमदार राम कदमांचा तीव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त करून पोलिसांच्या समर्थनात आरपीआय डेमोक्रॅटिक पक्ष उभा असल्याचेही यावेळी बोलताना माकणीकर म्हणाले.
पोलिसांवर हल्ले कदापि सहन केले जाणार नाहीत, पोलिसांवर हल्ले करणाऱ्या गुंडांवर विशेष पथक नेमून गुंड व त्यांच्या समर्थकांना चांगलाच धडा शिकविण्यात यावा. पोलीस शिपायाला संरक्षित करून गुंड व त्यांच्या समर्थकांना शासकीय कामात अडथळा करण्याचा गुन्हा नोंदवून आमदार राम कदमांवरही कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी डॉ. माकणीकर, कॅप्टन श्रावण गायकवाड व राजेश पिल्ले यांनी केली आहे.
No comments yet.