नदीचा नाला झालेल्या मिठी नदीमध्ये मासे दिसणे म्हणजे एक दुर्मिळ बाब. मात्र त्याच मिठी नदीत आता थोड्याफार प्रमाणात का होईना मासे दिसू लागले आहेत. ‘मिठी नदी जल गुणवत्ता सुधार’ या प्रकल्पाद्वारे मिठी नदीतील पाण्याची गुणवत्ता वृद्धिंगत करून ते पाणी पुन्हा मिठी नदीमध्ये सोडण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे प्रकल्प परिसरातील नदीतील पाण्याची गुणवत्ता सुधारत त्यात आता मासे दिसू लागले आहेत.
मनपा आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त मनपा आयुक्त पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनानुसार हा प्रकल्प राबवण्यात येत आहे.
पवईतील विहार तलावाच्या ओव्हरफ्लो झालेल्या पाण्याच्या प्रवाहातून उगम पावणारी ही नदी पुढे मुंबईत समुद्राला मिळते. विहार आणि पवई तलावांमधून होणारा विसर्ग हा या नदीमध्ये सामावत ही नदी माहीमच्या खाडीतून समुद्राला जाऊन मिळते. मिठी नदीची एकूण लांबी १७.८४ किलोमीटर एवढी आहे. साधारणताः ७ हजार २९५ हेक्टर एवढे या नदीचे पाणलोट क्षेत्र आहे.
८०-९०च्या दशकापर्यंत स्वच्छ निर्मल समृद्ध नदी म्हणून ओळख असणाऱ्या मिठी नदीच्या पात्रात टाकला जाणारा घनकचरा, सांडपाणी आणि परिसरात कालांतराने झालेले अतिक्रमण आदी समस्यांत अडकली. पुढे मुंबईच्या विविध भागातून येणारे नाले या नदीत येवून मिळत असल्याने या नदीला नाल्याचेच स्वरूप प्राप्त झाले आहे. पुढे २६ जुलै २००५ला मुंबईमध्ये झालेल्या प्रलयकारी पावसानंतर पूर परिस्थिती हाताळण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मिठी नदी विकास आणि संरक्षण प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर दोन टप्प्यांमध्ये मिठी नदीचे रुंदीकरण, खोलीकरण, संरक्षण भिंत बांधणे आणि सेवा रस्ता बांधण्याचे काम हाती घेण्यात आले. यापैकी बहुतांश कामे आता पूर्णत्वास आहेत.
या मिठी नदीला तिचे पूर्वीचे वैभव पुन्हा प्राप्त व्हावे यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे सातत्याने विविध स्तरीय उपक्रम राबवले जात असून, त्याची पाण्याची गुणवत्ता सुधारत तिला पुन्हा नदीचे रूप देण्याचे कार्य पालिकेतर्फे सुरु आहे. तसेच २६ जुलैसारखी परिस्थिती पुन्हा उद्भवली तर मिठी तयार होत आहे.
No comments yet.