लेकहोममध्ये घरफोडी, २.५ लाखाचा ऐवज साफ

प्रातिनिधिक

प्रातिनिधिक

मंगळवारी चांदिवली येथील लेकहोम, एव्हरेस्ट हाईट इमारतीच्या बाराव्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक १२०७/१ मध्ये, डक्टच्या साहय्याने बाथरूममध्ये घुसून, घरातील ६ लाख रुपये किंमतीच्या ऐवजावर अज्ञात चोरट्याने हात साफ केला आहे. पवई पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंद करत सोसायटीत असलेल्या सीसीटीव्हीच्या फुटेजच्या  आधारे तपास सुरु केला आहे.

लेकहोम, एव्हरेस्ट हाईट इमारतीच्या बाराव्या मजल्यावरील १२०७/१ मध्ये सहकुटुंब राहणारे विश्वनाथ रेड्डी यांचा स्वतःचा व्यवसाय असून, त्यांची पत्नी बँकेत नोकरी करते, तर मुलगा शिक्षण घेत आहे. पती पत्नी सकाळी कामाला बाहेर पडल्यानंतर रेड्डी यांचा मुलगाच घरी असतो, मात्र त्याच्या मित्राचे लग्न असल्यामुळे सध्या तो बाहेर आहे.

“मंगळवारी सकाळी नेहमी प्रमाणे मी आणि माझी पत्नी ९.३० वाजता कामावर निघून गेलो. संध्याकाळी ५.३० वाजता जेव्हा माझी पत्नी घरी परतली तेव्हा बेडरूममधील कपाट उघडे होते, सामान अस्ताव्यस्त पडले होते आणि कपाटातील सोन्याचे दागिने, हिऱ्याचे मंगळसूत्र व रोकड असे मिळून जवळपास २.५१ लाखाची मालमत्ता गायब होती” असे पोलीस जवाबात रेड्डी म्हणतात.

या संदर्भात आवर्तन पवईशी बोलताना पवई पोलीस स्टेशनच्या तपासी अधिकाऱ्यांनी सांगितले, “डक्टमधून चढून येऊन बाथरूमच्या खिडकीच्या सहाय्याने चोरट्याने घरात प्रवेश मिळवलेला आहे. घरात अस्ताव्यस्त पडलेले सामान पाहता चोरट्याने अजूनही काही मिळते आहे का? याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसतेय. याकाळात घरात कोणी नसणार असल्याची पक्की माहिती चोरट्याकडे होती, त्यामुळे तो ओळखीच्या व्यक्तींपैकीच कोणीतरी असल्याची शक्यता नाकारता येत नाही.”

“आम्ही शेजारी आणि सुरक्षारक्षकांचा जवाब नोंदवला आहे. आत बाहेर येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे रेकॉर्ड आणि सीसीटीव्ही फुटेज आम्ही बारकाईने तपासत आहोत. काही धागेदोरे आमच्या हाती लागले असले तरी आम्ही त्यांची खात्री पटवून घेत आहोत.” असे आवर्तन पवईशी बोलताना अजून एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

या संदर्भात पवई पोलिसांनी कलम ३८०, ४५४ भादवि नुसार घरफोडीचा गुन्हा नोंद करून, सोसायटीत असलेल्या सीसीटीव्हीच्या फुटेजच्या आधारे तपास चालू केला आहे.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

, , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!