पवईकर आणि माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव खटल्यात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (आयसीजे) आज निकाल सुनावला. ६.३० वाजता सुरु झालेल्या या निकालात भारताच्या बाजूने निकाल देण्यात आलेला आहे. १६ न्यायमूर्तींनी दिलेल्या या निकालात १५ विरुद्ध १ असा निर्णय भारताच्या पारड्यात पडला. केवळ पाकिस्तानच्या न्यायमूर्तींनी या विरोधात आपले एक मत नोंदवले. या निर्णयामुळे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकटे पाडण्यात भारताला यश आले आहे.
आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेला हा निर्णय मान्य करायचा की नाही, हा निर्णय सर्वस्वी पाकिस्तानचा असणार आहे. मात्र पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय कोर्टाचा निर्णय अमान्य केल्यास पाकिस्तान स्वतःहून जगभरात घेरलं जाईल.
कुलभूषण जाधव यांच्या बाबतीत पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केल्याचंही यावेळी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने मान्य केले. यामुळे भारतासाठीची पुढील वाटचाल सोपी झाली आहे. या प्रकरणात भारताला आता कौन्सिलर एक्सेस मिळणार आहे. यामुळे हा खटला पुन्हा चालवला जावून भारतालाही खटला लढवण्याचे अधिकार मिळतील.
फाशीला स्थगिती
कुलभूषण जाधव यांच्यावर हेरगिरीचा ठपका ठेवत पाकिस्तानच्या मिलिट्री कोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. पाकिस्तानच्या मिलिट्री कोर्टाने सुनावलेल्या या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने २०१७ मध्ये दिलेल्या स्थगितीला कायम ठेवण्यात आले आहे. पाकिस्तानने जाधव यांना सुनावलेल्या फाशीचा पुनर्विचार करावा. या शिक्षेचा पुनर्विचार होत नाही तोपर्यंत त्यांना दिलेली फाशीची शिक्षा स्थगित करण्यात येत असल्याचा आदेश यावेळी न्यायालयाने दिला.
या प्रकरणात भारताकडून बाजू मांडताना हरिश साळवे यांनी अत्यंत हुशारीने आणि प्रभावीपणे युक्तिवाद करत भारताला कौन्सिलर एक्सेस मिळवून देण्याचा मार्ग मोकळा केला आहे. मात्र पाकिस्तान या निर्णयावर काय भूमिका घेते यावर सर्व काही ठरणार आहे.
पाकिस्तानने निर्णयाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास भारतकडे यूएनएससी म्हणजेच संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेकडे दाद मागण्याचा अधिकार आहे. यूएनएससीमध्ये अमेरिका, ब्रिटन, रशिया, चीन आणि फ्रान्सचा समावेश आहे. पाचही देशांसोबत भारताचे सध्याचे संबंध अत्यंत चांगले आहेत. त्यामुळे निर्णयाची अंमलबजावणी न केल्यास भारताला आपल्या आंतरराष्ट्रीय संबंधांचा वापर करत आंतरराष्ट्रीय स्तरातून दबाव वाढवता येणार आहे.
No comments yet.