मुंबईत गांजाच्या तस्करीसाठी आलेल्या पुण्याच्या इसमाला अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या वांद्रे युनिटने मंगळवारी अटक केली. त्याच्याकड़ून २१ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदली बशीर अहमद अन्सारी (४५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स अॅक्ट (एनडीपीएस) कायदा १९८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मादक पदार्थांची खरेदी करणार्यांचा शोध घेण्यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांनुसार गस्त घालत असताना पोलिस उपनिरीक्षक पवळे आणि पथकाला पवई परिसरात गांजाच्या तस्करीसाठी एक जण येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, त्यांनी शंकर मंदिर बसस्थानक, जल अभियंता कार्यालयाच्या गेटजवळ, साकीविहार रोड येथे सापळा रचला होता.
एक इसम संशयास्पदरित्या वावरत असल्याचे पाहून त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडील बॅगेत ४ लाख २० हजार किंमतीचा २१ किलो गांजा मिळून आला. एका नायलॉनच्या पिशवीत गांजा घेऊन हा इसम येथे विक्रीसाठी आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी त्याच्याविरूद्ध कलम ८ (सी) आर/डब्ल्यू २० (सी) एनडीपीएस कायदा १९८५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
याच परिसरात एक ज्येष्ठ नागरिक महिला गांजा विक्रीचा व्यवसाय करते हा इसम तिलाच हा गांजा विक्रीसाठी आला असण्याची शक्यता आहे, असे याबाबत बोलताना पोलिसांनी सांगितले.
No comments yet.