चांदिवली विधानसभा परिसरात वाढत असलेल्या प्रदूषणाबाबत मुंबई महानगरपालिका सहआयुक्त अश्विनी भिडे आणि पालिका वरिष्ठ अधिकारी यांच्याशी स्थानिक आमदार दिलीप (मामा) लांडे यांनी चर्चा करत त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी विशेषतः नहार आणि चांदिवली भागात झपाट्याने वाढत असणाऱ्या प्रदूषणाकडे त्यांचे लक्ष वेधले.
चांदिवलीतील समस्यांसाठी एकजूट होत लढण्यासाठी सहभागी व्हा “चांदिवली सिटीझन वेल्फेअर असोसिएशन”मध्ये.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असतानाच मुंबईला ‘कचरामुक्त व प्रदुषणमुक्त आणि गतिमान मुंबई बनवूया, असे आवाहन मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी मुंबईकरांना केले आहे. याची अंमलबजावणी करतानाच मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी पालिका विविध उपाययोजना करीत आहे. मात्र तरीही काही भागात ही समस्या अजूनही तशीच आहे. यातील एक म्हणजे चांदिवली परिसर.
चांदिवली परिसराच्या आसपासच्या भागात असणाऱ्या कारखान्यांच्या चिमण्यांमधून निघणाऱ्या धुरांमुळे परिसरात वायुप्रदूषण वाढत असल्याची तक्रार येथील नागरिकांकडून सतत केली जात असते. नहार परिसरात अनेकदा धुक्यासारखे वातारण पहावयास मिळत असते.
“चांदिवली विशेषतः नहार भागातील प्रदूषणाबद्दल मला अनेक तक्रारी मिळाल्या आहेत. त्या अनुषंगाने मी पालिका सहआयुक्त अश्विनी भिडे यांच्याशी चर्चा करून ही समस्या लवकरात लवकर संपुष्टात आणण्याची मागणी केली,” असे लांडे यांनी सांगितले.
पवई पाठोपाठ चांदिवली परिसराचा देखील मोठ्या झपाट्याने विकास होत आहे. मात्र हा विकास सुरु असतानाच येथील समस्या देखील वाढत आहेत. प्रदूषण, खड्डेयुक्त रस्ते, वाहतूक कोंडी, अनधिकृत फेरीवाले, कचरा अशा अनेक समस्या सध्या या परिसरातील नागरिकांना भेडसावत आहेत. यासंदर्भात स्थानिक नागरिक सतत लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्याकडे पाठपुरावा करत आहेत. या समस्यांशी एकजूट होत लढण्यासाठी चांदिवली सिटीझन वेल्फेअर असोसिएशन (CCWA) स्थापन करण्यात आली आहे. या परिसरातील समस्या मांडण्यासाठी आणि त्या सोडवून घेण्याकरता एकजूट होण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन मनदीप सिंग यांच्याकडून करण्यात आले आहे.
No comments yet.