पवई, हिरानंदानीला विक्रोळीशी जोडणाऱ्या हिरानंदानी- विक्रोळी लिंकरोडच्या रुंदीकरण कामाची आमदार सुनील राऊत यांनी महानगरपालिका उपायुक्त देविदास क्षीरसागर, पालिका ‘एस’ विभाग सहाय्यक आयुक्त अजितकुमार अंबी आणि रस्ते विभाग अधिकारी व इतर पालिका अधिकारी यांच्यासोबत बुधवारी पाहणी केली. यावेळी उपविभागप्रमुख धर्मनाथ पंत, शाखाप्रमुख सचिन मदने, शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
हिरानंदानीला विक्रोळीशी जोडणारा हिरानंदानी – विक्रोळी लिंकरोड वादाच्या भोवऱ्यात अडकल्याने कित्येक वर्ष नादुरुस्त अवस्थेत होता. यामुळे प्रवाशांना जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोड मार्गे गांधीनगर आणि नंतर एसवी रोडवरून विक्रोळीकडे जावे लागत होते. अखेर वादावर निर्णय आला आणि जमीन पालिकेला हस्तांतरित होताच तत्कालीन विधान परिषद सदस्य आर एन सिंग यांच्या फंडातून स्वामीनारायण चौक ते टाटा पॉवर पर्यंतच्या रस्त्याच्या सिमेंटीकरणाचे काम करण्यात आले होते. त्यामुळे हिरानंदानीकडून विक्रोळीकडे जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांना चांगलाच दिलासा मिळाला होता.
मात्र काहीच दिवसात या रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे आणि टाटा पॉवर ते कैलाश कॉम्प्लेक्स पर्यंत असलेल्या खराब रस्त्यामुळे नागरिकांना तासंतास अडकून पडावे लागत आहे. त्यातच कैलाश कॉम्प्लेक्सकडून हिरानंदानीच्या दिशेने येताना मोठी चढाई करावी लागत असून, वाहतूक कोंडीत गाड्या अडकून पडल्याने अनेक गाड्यांचे क्लच प्लेट जाळून किंवा इतर कारणाने नुकसान होत आहे. या अनुषंगाने उपविभागप्रमुख धर्मनाथ पंत यांच्या नेतृत्वात हिरानंदानीतील रहिवाशी प्रतिनिधींनी स्थानिक आमदार सुनील राऊत यांची भेट घेत हा रोड बनवण्याची मागणी केली होती.
“नागरिकांनी केलेल्या मागणीसाठी मी महानगर पालिकेकडे पाठपुरावा करत, या परिसरात असलेल्या विकास नियोजन ९० फुटी रस्त्याच्या निर्मितीची मागणी केली आहे. त्या अनुषंगाने बुधवारी पालिका उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, रस्ते विभागाचे अधिकारी, इतर पालिका अधिकारी आणि स्थानिक नागरिक यांच्यासोबत मी पाहणी केली आणि समस्या समजून घेतली. याबाबत लवकरच एक बैठक घेण्यात येणार असून, या रस्त्याच्या निर्मितीसाठी लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल,” असे यासंदर्भात बोलताना आमदार सुनील राऊत म्हणाले.
No comments yet.