शुक्रवार, १८ नोव्हेंबर रोजी खासदार पूनम महाजन यांनी चांदिवली परिसराचा दौरा करत येथील वाढत्या नागरी समस्यांचा आढावा घेतला. नागरिकांकडून समस्या जाणून घेतल्यानंतर त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करून नागरिकांना दिलासा देण्याच्या सूचना केल्या.
खासदार पूनम महाजन यांच्यासह सहाय्यक पोलिस आयुक्त (साकीनाका विभाग) भरतकुमार सूर्यवंशी, पवई वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. उत्तम सूर्यवंशी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक (पवई पोलिस ठाणे) बुधन सावंत, वरिष्ठ पोलिस निरीक्षक (साकीनाका पोलिस ठाणे) बळवंत देशमुख, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने चांदिवलीकर उपस्थित होते.
चांदिवलीचा गेल्या काही वर्षांत झपाट्याने विकास झाला आहे. विकास अजूनही सुरू आहे आणि हळूहळू हे क्षेत्र बदलत आहे. मात्र, यासोबतच नागरी समस्याही या भागात जाणवू लागल्या आहेत. याबाबत स्थानिक नागरिक लोकप्रतिनिधींकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. या समस्या समजून घेण्यासाठी व त्यावर उपाय शोधण्यासाठी खासदार पूनम महाजन यांनी शुक्रवारी सायंकाळी चांदिवली येथील चांदिवली फार्म रोड आणि रहेजा विहार येथील समस्यांचा अभ्यास केला. या भागातील वाहतूक कोंडी आणि कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित समस्या त्यांनी नागरिकांकडून जाणून घेतल्या.
चांदिवली फार्म रोडवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी चांदिवलीतील तिन्ही चौकात वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याचे आणि रस्त्याच्या कडेला असलेली वाहनांची पार्किंग हटविण्याचे आदेश वाहतूक विभागाला दिले.
रहेजा विहार येथील नागरिकांनी महाजन यांच्याकडे महापालिकेच्या मैदानातील अंधाराचा फायदा घेत मद्यधुंद अवस्थेचा आणि रहेजा विहार प्रवेशद्वाराजवळील भागात कॉल सेंटर व परिसरातील इतर ठिकाणाहून येणाऱ्या तरुणांचा उपद्रव रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची विनंती केली.
पवई आणि साकीनाका या दोन्ही पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना त्यांनी अंमली पदार्थांचे व्यसन रोखण्यासाठी आणि त्यांच्या अखत्यारीतील भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी स्थानिक नागरिकांच्या मदतीने काम करण्याचे आदेश दिले.
पूनम महाजन यांच्यासमोर वाहतूक आणि कायदा सुव्यवस्थेसोबतच इतरही अनेक समस्या नागरिकांनी मांडल्या. मात्र, यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांनी फोनवर संबंधित अधिकाऱ्यांना यासंदर्भात सूचना दिल्या. लवकरच पालिका व इतर विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करून समस्या जाणून घेण्याचे आश्वासन देखील यावेळी त्यांनी नागरिकांना दिले.
No comments yet.