एस एम शेट्टी शाळेजवळ दोन अपघातात एकाचा मृत्यू; एक गंभीर जखमी

पवईतील एसएम शेट्टी शाळेजवळ घडलेल्या विविध दोन अपघातात एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे तर दुसऱ्या घटनेत एक मोटारसायकल स्वार गंभीर जखमी झाला आहे. या संदर्भात पवई पोलिसांनी गुन्हा दाखल करत वाहनचालकांना अटक केली आहे. सलग घडत असलेल्या अपघाताच्या घटनांनी या परिसरातील नागरिक भयभीत झाले असून, या मार्गावर किमान २ ते ३ स्पीड ब्रेकर बनवण्याची मागणी करत आहेत.

अप्पापाडा कुरार येथे राहणारा २३ वर्षीय तरुण रणजीत देवमन जयस्वार (२३) हा आपल्या कामानिमित्त पवई येथे आला होता. “पायी चालत तो हिरानंदानीच्या दिशेने जात असताना एस एम शेट्टी शाळेजवळ येताच त्याच्या पाठीमागून येणाऱ्या मोटारसायकल क्रमांक एमएच ०३ डीक्यू ४८५५ ने त्याला जोरदार धडक दिल्याने तो उडून झाडावर आदळून गंभीर जखमी झाला होता. त्याच्या डोक्याला, पायाला आणि हाताला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला,” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

या संदर्भात पवई पोलिसांनी भादवि कलम ३०४ आणि २७९ सह मोटर वाहन कायदा १३४ (ए, बी) नुसार गुन्हा नोंद करत मोटारसायकल चालक विजय बहादूर वर्मा (२१) याला अटक केली आहे.

दुसऱ्या घटनेत साकीनाका असल्फा येथे राहणारा शुभम लोखंडे हा आपला मित्र अनिकेत राउळ याच्यासोबत वाढदिवसाची पार्टी साजरी करण्यासाठी पवईतील हिरानंदानी परिसरात आला होता. पार्टी साजरी करून १ वाजताच्या सुमारास दोघे आपल्या आपल्या मोटारसायकलने घरी परतत होते. “एस एम शेट्टी शाळेजवळून जात असताना शुभम चालवत असणाऱ्या स्कुटी मोटारसायकल क्रमांक एम एच ०३ सीयु ६६४४ला याच रस्त्यावरून भरधाव धावत असणाऱ्या एम एच ०२ ईआर ८०५९ ने धडक दिली. या घटनेत शुभमच्या डाव्या पायाच्या मांडीला डंपर धडकल्याने तो गंभीररित्या जखमी झाला,’ असे पवई पोलिसांनी सांगितले.

भादवि कलम २७९, ३३८, ३३७ नुसार गुन्हा नोंद करत पवई पोलिसांनी डंपर चालक मोहमद इलियास शहा (५७) याला बेड्या ठोकल्या आहेत.

पाठीमागील आठवड्यात याच भागात गाडीवरील ताबा सुटल्याने एक कार जलवायू विहार कॉम्प्लेक्सच्या सुरक्षा भिंतीला धडकल्याची घटना घडली होती. सतत घडत असणाऱ्या अपघाताच्या घटनांनी या परिसरात चिंतेचे वातावरण आहे. यासंदर्भात बोलताना येथील इमारत क्रमांक २५मध्ये राहणारे स्थानिक नागरिक अनिल भदिगरे यांनी या परिसरात किमान २ ते ३ स्पीड ब्रेकर बनवण्याची मागणी केली.

, , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!