चांदिवली – हिरानंदानी परिसराला जोडणाऱ्या पंचसृष्टी रोडचे सिमेंट कॉंक्रीटीकरण काम पूर्ण झाले असून, हलक्या वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. चांदिवली विधानसभा आमदार दिलीप (मामा) लांडे यांनी रस्त्याच्या कामाची पाहणी केल्यानंतर शुक्रवारपासून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
पंचसृष्टी रोड वर्षानुवर्ष विकासक आणि पालिका यांच्या अनुमतीत अडकून पडल्याने दुरावस्थेत होता. यासंदर्भात आवर्तन पवई आणि स्थानिक नागरिक यांनी केलेल्या सतत पाठपुराव्यानंतर जानेवारी २०२१ला स्थानिक आमदार दिलीप (मामा) लांडे यांनी या रस्त्याचे काम करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र वर्षभर उलटले तरी विविध कारणाने या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नव्हती.
यासंदर्भात सतत पाठपुरावा करतानाच आवर्तन पवईने १८ एप्रिलला ‘मामा आमच्या रोडचा मुहुर्त कधी?’ या मथळ्याखाली बातमी करत आमदारांचे याकडे लक्ष वेधले होते. ज्याच्या उत्तरादाखल शाळांना सुट्ट्या लागताच काम सुरु करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. अखेर १६ मे रोजी त्यांच्या प्रयत्नातून गुंडेचा हिल इमारत ते भक्तांनी क्रीशांग या मार्गावर सिमेंट कॉंक्रीट रोडच्या निर्मितीचे काम सुरु झाले होते.
या मार्गावर सुरु असणाऱ्या कामामुळे हा संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला होता. त्यामुळे वाहनांना डीपी रोड नंबर ९ मार्गे लांबून प्रवास करावा लागत होता. लहान वाहनांनी याच परिसरात असणाऱ्या चाळसदृश्य वस्तीतील छोट्याशा मार्गाचा पर्याय निवडल्याने तिथेही नेहमीच वाहतूक कोंडी निर्माण होत होती. त्यातच १३ जूनपासून पवईतील अनेक शाळा सुरु झाल्याने पंचसृष्टी रोडची नितांत गरज जाणवू लागली होती.
आमदारांकडे मुलांची होणाऱ्या अडचणीबाबत चर्चा केल्यानंतर शुक्रवार १७ जूनला त्यांनी बनवण्यात आलेल्या सिमेंट कॉंक्रीट रोडच्या कामाची पाहणी करून रोड वाहतुकीसाठी तयार असल्याची खात्री करून घेत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला आहे.
या मार्गाच्या सिमेंट कॉंक्रीटीकरणाच्या कामामुळे आणि वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्यानंतर नागरिकांनी आणि स्थानिकांनी आनंद व्यक्त केला आहे. “यापूर्वी स्थानिक नगरसेवक आणि माजी आमदार यांनी फक्त या मार्गावर खड्डे भरण्याचे काम केले होते. त्यामुळे काही दिवसातच रस्ता उखडला जावून पुन्हा मोठ मोठे खड्डे निर्माण होत. मात्र यावेळी आमदार दिलीप (मामा) लांडे यांनी ही समस्या सिमेंट कॉंक्रीट रस्ता बनवून पूर्णपणे संपवली आहे. शिवाय अखेर दोन दशकाने का होईना अखेर या परिसराला एक पक्का आणि मजबूत रोड मिळाला आहे.” असे यासंदर्भात बोलताना स्थानिक नागरिक म्हणाले.
ते पुढे म्हणाले “रस्त्याच्या निर्मितीपूर्वीच त्यांनी परिसरातील गटारे, पर्जन्यवाहिन्या, पथदिवे यासारख्या सोयीसह जमिनीखालून जाणाऱ्या विविध प्रकारच्या केबल्स आणि पाईपलाईन्सचे काम देखील करून घेतले आहे. त्यामुळे रस्ता बनल्यानंतर इतर सोयींच्या नावाखाली होणारे खोदकाम टाळले जाणार आहे.”
हा मार्ग केवळ हलक्या वाहनांसाठी वापरण्यात यावा, अवजड वाहने इतर मार्गे वळवण्यात यावीत अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात ते पवई वाहतूक विभागाशी पत्रव्यवहार करणार असल्याचे स्थानिक नागरिक म्हणाले.
No comments yet.