पवई, चांदिवली भागात जोरदार गाड्या पळवणे, ट्रिपल सिट प्रवास करणे, जोरजोरात हॉर्न वाजवणे, सायलेंसरचा आवाज करत गाडी चालवणे अशी कृत्ये करत नागरिकांना त्रास देत हुल्लडबाजी करणाऱ्या १५०० पेक्षा अधिक वाहनचालक तरुण तरुणींवर पोलिसांनी कारवाई करत धडा शिकवला आहे. यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश अधिक आहे.
घरातून शाळा कॉलेजला जातो सांगून मुंबईच्या रस्त्यांवर हुल्लडबाजी करत फिरणाऱ्या तरुणांची संख्या कमी नाही. पवई आणि चांदिवली परिसरात देखील महाविद्यालयीन विद्यार्थी अशी हुल्लडबाजी करत असल्याची तक्रार नागरिकांकडून सतत केली जात होती. विशेषतः पवईतील हिरानंदानी भागात रस्त्यांवर तरुण सायलेंसरचा आवाज करत भरधाव मोटारसायकल चालवत असल्याची, वन-वेमध्ये घुसून वाहतूक कोंडी करत असल्याची, परिसरात रस्त्यावर कुठेही गाड्या लावून हुल्लडबाजी करत असल्याची तक्रार नागरिकांसह, हिरानंदानी रेसिडेंट असोसिएशनच्या माध्यमातून पोलिसांना केली जात आहे.
या निमित्ताने पवई पोलिसांनी परिसरात गस्त देखील वाढवली होती. मात्र तरुण पोलीस गाडी पुढे जाताच पाठीमागे हुल्लडबाजी करण्यास सुरुवात करत असत. दिवसातर दिवसा रात्रीच्या वेळी सुद्धा मोठमोठ्याने आवाज करत तरुण रस्त्यांवरून भरधाव वेगात गाड्या पळवत असतात. जे पाहता काही दिवसांपूर्वीच उपआयुक्तांच्या अखत्यारीतील डेल्टा १ ही गाडी, ज्यावर प्रत्येक पोलीस ठाण्याचे २ पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असतात ती हेरीटेज उद्यान येथे तैनात करण्यात आली आहे.
डेल्टा १च्या नियुक्तीपासून या परिसरात चालणारी तरुणांची हुल्लडबाजी कमी झाली असली तरी इतर भागात तरुण हुल्लडबाजी करतच आहे. “विशेषत: येथील सेन्ट्रल अव्हेन्यू रोडवरील ब्लू बेल ते सायप्रेस भागात वन वे करण्यात आला आहे. याच भागात काही खाण्यापिण्याची दुकाने देखील आहेत. त्यामुळे महाविद्यालयीन आणि हिरानंदानीतील कार्यालयात कामासाठी येणारे अनेक तरुण-तरुणी येथे जमा होत नागरिकांना त्रासदायक कृत्ये करत असतात,” असे यासंदर्भात बोलताना पवई रेसिडेंटस असोसिएशनच्या सदस्यांनी सांगितले.
“हीच परस्थिती गलेरिया जवळील भागात तसेच पवई विहार आणि विजय विहार जवळील भागामध्ये देखील असते.” असे अजून एका सदस्याने सांगितले.
नागरिकांच्या या तक्रारींची दखल घेत पवई पोलिसांनी आता कारवाईची बडगा उचलला आहे. हिरानंदानी येथील एसएम शेट्टी शाळा आणि ब्लू बेल भागात पोलिसांनी विशेष २ पथके तयार करून कारवाई सुरु केली आहे. ट्रिपलसिट फिरणारे, बिना हेल्मेट फिरणारे, सायलेंसरचा आवाज करत मोटारसायकलवरून फिरणारे, वन वेमधून प्रवास करणारे अशा सगळ्यांवरच पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे.
यासोबतच हिरानंदानीतील विविध भागात हे गस्तीवरील पथक तैनात करून ही कारवाई केली जात आहे. पवई सोबतच चांदिवली भागात देखील साकीनाका पोलिसांनी अशा हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवर कारवाई सुरु केली आहे.
“नागरिकांच्या याबाबत सतत तक्रारी आम्हाला येत आहेत. यासाठी विशेषतः शाळा सुटण्या आणि भरण्याच्या काळात आम्ही शाळा कॉलेजेस असलेल्या परिससरासह तरुणांच्या जमा होण्याच्या जागांवर पोलीस पथके तैनात करत याला रोखण्यासाठी कारवाई सुरु केली आहे. वारंवार चुका करणाऱ्या तरुणांच्या घरच्यांना बोलावून आम्ही सदर प्रकार निदर्शनास आणून देत आहोत. तसेच मुलांच्या या चुकीसाठी पालकांवर देखील कारवाई होऊ शकते याची त्यांना जाणीव करून देत आहोत.” असे यासंदर्भात बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.
अजून एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “मुले घरातून येताना बस, ट्रेन असाच प्रवास करत आहेत. मात्र पवईतील अनेक भागात आणि विशेषतः हिरानंदानीत ऐपच्या माध्यमातून गाड्या भाड्याने मिळत आहेत. या गाड्या रस्त्यांवर अनेक ठिकाणी पार्क करून ठेवलेल्या असतात. समोरील व्यक्तीने फक्त त्या कंपनीचे ऐप डाऊनलोड करून गाडीवरील बारकोड स्कॅन करायचा की झाले, गाडी मिळाली. त्यामुळे शालेय विद्यार्थी देखील आता ह्या गाड्या घेवून रस्त्यांवरून फिरत आहेत. याच्यावर या सुविधा देणाऱ्या कंपन्यांचे नियंत्रण कसे आहे देवच जाणे. आणि यामुळे हे प्रकार या परिसरात वाढीला लागले आहेत.”
No comments yet.