पवईत सफाई कर्मचाऱ्याने फ्लॅटमध्ये घुसून चिरला तरुणीचा गळा

डावीकडे -पवई पोलीस पथक आरोपीला तपासकामी घेवून जाताना, उजवीकडे रुपल ओगरे (फाईल फोटो)

पवईत राहणाऱ्या २३ वर्षीय प्रशिक्षणार्थी एअर हॉस्टेस तरुणीची त्याच इमारतीत काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याने गळा चिरून खून केल्याची घटना रविवारी पवईमध्ये घडली. या संदर्भात पवई पोलिसांनी आरोपी सफाई कर्मचारी विक्रम अटवाल (३५) याला १० तासाच्या आत अटक केली आहे.

मूळची रायपुरची असणारी आणि प्रशिक्षणार्थी एअर हॉस्टेस रुपल ओगरे आपल्या मोठ्या बहिणीसह पवईतील, अशोकनगर भागातील एन जी कॉम्प्लेक्समधील तिसऱ्या मजल्यावरील  फ्लॅटमध्ये राहत होती. काही दिवसांपूर्वी तिची बहिण कामानिमित्त गावी गेल्याने ती एकटीच होती. रविवारी तिची बहिण आणि वडील दिवसभर रुपलला फोन करत होते, मात्र ती फोन उचलत नसल्याने तिच्या बहिणीने आपल्या एका मित्राला तिथे जावून नक्की काय झाले आहे हे पाहण्याची विनंती केली, असे पवई पोलिसांनी आवर्तन पवईला सांगितले.

एन जी कॉम्प्लेक्स अशोकनगर, पवई

ते पुढे म्हणाले, “दरवाजा ठोठावून देखील कोणीच दरवाजा उघडत नसल्याने मित्राने रुपलच्या बहिणीला याबाबत माहिती दिल्यावर तिने चावीवाल्याला बोलावून त्याला दरवाजा उघडण्यास सांगितले. तो दरवाजा उघडून आत गेला तेव्हा बाथरूममध्ये रूपल गळा चिरलेल्या अवस्थेत पडलेली दिसून आली. याबाबत त्याने त्वरित तिचे पालक आणि पोलिसांना माहिती दिली.

“परिमंडळ १० मधील विविध पोलीस ठाण्याच्या कुशल अधिकाऱ्यांची विविध ८ तपास पथके बनवून आम्ही गुन्ह्याचा तपास सुरु केला होता.” असे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी सांगितले.

“परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत सुरक्षारक्षक, घरकाम करणाऱ्या महिला, बाहेरून येणा-जाणारी लोक, सफाई कर्मचारी आणि इतर अशा ३५ लोकांकडे आम्ही चौकशी सुरु केली. तांत्रिक माहिती आणि कुशल तपासाच्या आधारावर याच इमारतीत कचरा जमा करण्याचे आणि साफसफाईचे काम करणाऱ्या ३५ वर्षीय विक्रम याच्या कसून चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली,” असे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) विनोद लाड यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “तरुणीने हल्ला करणाऱ्या व्यक्तीला प्रतिकार करताना त्याच्यासोबत झटापट झाल्याचे तिला झालेल्या जखमांवरून समजत होते. अनेक लोकांची चौकशी सुरु असताना आरोपीची हालचाल, बोलणे संशयित वाटत होते. तसेच त्याच्या हाताला देखील ताजी जखम झालेली दिसून येत असल्याने याबाबत विचारणा केली असता तो समाधानकारक उत्तर देवू शकला नव्हता. त्यामुळे त्याच्याकडे कसून केलेल्या तपासात त्याने तरुणीच्या गळ्यावर चाकूने हल्ला करून तिचा खून केल्याची कबुली दिली. गुन्ह्यात वापरलेला चाकू त्याने फेकून दिला असून, तो हस्तगत करणे बाकी आहे.

अटक आरोपीसह पवई पोलिसांचे पथक

“आरोपी हा त्याच इमारतीत सफाई कर्मचारी आहे, त्यामुळे एखाद्या फ्लॅटमध्ये काही काम असल्यास तो तिथे जात असे, रविवारी घटनेच्या वेळेस देखील तो काहीतरी कामानिमित्त रुपलच्या फ्लॅटमध्ये गेला असावा असेच प्रथमदर्शनी समोर येत आहे,” असे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुप्रिया पाटील यांनी सांगितले.

आरोपीने रुपलचा गळा चिरून खून का केला? याबाबत अजून अस्पष्टता असून, घरात कसलीही चोरी करण्यात आलेली नाही. पोलीस गुन्ह्याच्या हेतूबाबत आरोपीकडे चौकशी करत आहेत.

घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येत असून, रुपलची बहिण आणि पालक मुंबईत दाखल झाले आहेत. पवई पोलीस त्यांचा जवाब नोंदवणार असून, रुपलचा आरोपी सोबत काही वाद होता का? याबाबत त्यांच्याकडे चौकशी करणार आहेत.

एन जी कॉम्प्लेक्सच्या सुरक्षारक्षकाने याबाबत बोलताना आवर्तन पवईला सांगितले कि, “रुपल आपल्या बहिणीसह पाठीमागील ३ महिन्यांपासून तिथे राहत होती. विक्रम हा सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे कामावर हजर झाला होता.”

“आरोपी हा खूप हुशार आहे. तरुणीचा गळा चिरल्यानंतर त्याने तिथेच बाथरूममध्ये रक्त धुवून, सुकवून मगच तो तेथून बाहेर पडला होता.” असे सपोनि लाड यांनी सांगितले.

पवई पोलिसांनी भादवि कलम ३०२ नुसार नोंद गुन्ह्यात विक्रम अटवाल याला सोमवारी अटक केली असून, मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. “शवविच्छेदन अहवालानंतरच आरोपीने या व्यतिरिक्त आणखी काही गुन्हा केला आहे का हे स्पष्ट होईल,” असे पवई पोलिसांनी सांगितले.

पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सह पोलीस आयुक्त (साकीनाका विभाग) भारतकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुप्रिया पाटील, पोलीस निरीक्षक प्रकाश कावळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गणेश पाटील, सपोनि विनोद लाड, पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील, पोलीस उपनिरीक्षक विशाल घोरपडे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर पिलाने, पोलीस उपनिरीक्षक गायकवाड, पोलीस अंमलदार बाबू येडगे, सुरवाडे, झेंडे, शेट्टी, ठाकरे, प्रशांत धुरी, पाटील, भोये, राठोड, शीतल लाड यांच्या पथकाने सदर गुन्हा उघडकीस आणला.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!