केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत पंजाब, हरियाणासह देशातील इतर भागातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारले आहे. कृषी कायदे रद्द करण्यासाठी राजधानी दिल्ली येथे गेल्या १६ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. दरम्यान सहा ते सात चर्चांनंतरही सरकार आणि शेतकरी आंदोलक यांच्यात तोडगा निघू शकलेला नाही. याच पार्श्वभूमीवर पवईमध्ये सुद्धा विविध पक्ष, संघटना आणि नागरिकांच्यावतीने आंदोलने करण्यात आली. पवईतील मुख्य रस्ता असणाऱ्या जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोड मार्गावर गणेशनगर ते पवई प्लाझा भागात मानवी साखळी बनवून नागरिकांनी शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठींबा दिला.
पाठीमागील दोन आठवड्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरुच आहे. आगामी काळात रेल रोकोही करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. नवीन कृषी कायदा हा मनमानी असून कोणत्याही चर्चेशिवाय हा कायदा मंजूर करण्यात आल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे.
पंजाब, हरयाणा – दिल्लीसह इतर भागातून आलेले शेकडो शेतकरी ठाण मांडून आहेत. दिल्लीच्या सिंघू बॉर्डरवर शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज (११ डिसेंबर) १६ वा दिवस आहे. तिन्ही कृषी कायदे बिनशर्त मागे घेण्यात यावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र हे कायदे मागे घेण्यास केंद्र सरकारने नकार दिला आहे.
पंजाबमधील शेतकरी कायदे मंजूर झाल्यापासूनच आंदोलन करत आहेत. मात्र ऑक्टोबर महिन्यात या आंदोलनाने आक्रमक रूप घेतले आणि आता हे आंदोलन देशाच्या राजधानीच्या सीमेवर पोहोचले आहे. केंद्र सरकारने या आंदोलनाची गंभीर दखल घेत चर्चा सुरू केल्या आहेत.
लाखोंचा पोशिंदा असणारा शेतकरी हा जगला तर सर्व जगतील आणि त्याला त्याचा अधिकार मिळालाच पाहिजे या उद्देशाने पवईमध्ये सुद्धा विविध पक्ष, संघटना आणि नागरिकांनी विविध मार्गाने आंदोलन करत केंद्र सरकारच्या विरोधात आपला निषेध नोंदवला. पवईतील काही भाग वगळता अनेक भागात यादिवशी दुकानदारांनी सुद्धा कडक बंद पाळत या आंदोलनाला आपला पाठींबा असल्याचे संकेत दिले. यावेळी जवळपास २ किमी लांब मानवी साखळी सुद्धा बनवण्यात आली.
“हे कायदे खासगी कंपन्यांना फायदा करून देतील आणि शेतकऱ्यांचे यामुळे नुकसान होईल आणि आमच्या पुढच्या पिढ्या या संकटात येतील” असे यावेळी आवर्तन पवईशी बोलताना आंदोलकांनी सांगितले.
No comments yet.