जोगेश्वरी- विक्रोळी लिंक रोडवरील (जेविएलआर) पवईतील मिलिंदनगर भागात देखभालीचं काम हाती घेण्यात आल्याने ट्राफिक पोलिसांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. सकाळी आणि संध्याकाळी कार्यालयांच्या वेळात नागरिकांनी येथील वाहतूक कोंडीत अडकून पडण्यापासून वाचण्यासाठी वाहतूक पोलिसांनी हा सल्ला दिला आहे.
सुरुवातीपासूनच पवईतील आदिशंकराचार्य मार्गावर वाहतूक कोंडी होत असल्याने, पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या जोगेश्वरी- विक्रोळी लिंक रोडच्या निर्मितीचे काम हाती घेण्यात आले होते. या कामामुळे पुढील अनेक वर्ष या मार्गावरील प्रवाशांचा वाहतूक कोंडीतील प्रवास निरंतर चालूच होता. रस्त्याच्या निर्मितीनंतर काहीसा उसासा मिळेल असे वाटले असतानाच हा मार्ग दोन्ही उपनगराना जोडणारा महत्वाचा दुवा असल्याने वाहतूक कोंडी वाढतच चालली आहे. एवढे कमीच होते कि नाही, मेट्रो ६च्या कामामुळे ठिकठिकाणी सुरु असणारे खोदकाम आणि वळवलेले रस्ते यामुळे नागरिकांना पुन्हा जुना आदिशंकराचार्य मार्ग भासू लागला आहे.
पाठीमागील अनेक वर्षात जेविएलआरवर सुरु असणाऱ्या कामांमुळे या मार्गावरील काही उड्डाणपुलांच्या दुरुस्ती/ डागडुजीची कामे रखडलेली आहेत. मेट्रो ६ प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असल्याने या मार्गावर पुन्हा वाढणारा बोजा लक्षात घेता येथील पुलांच्या आपत्कालीन व अत्यावश्यक देखभालीची कामे हाती घेण्यात आली आहेत.
मिलिंदनगर येथील पुलाच्या कामाची माहिती प्रसिद्ध करताना पोलीस उपायुक्त (पूर्व उपनगर) वाहतूक मुंबई यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात ‘जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील मिलिंदनगर येथील पुलाच्या आपत्कालीन व अत्यावश्यक देखभालीच्या कामामुळे उत्तर व दक्षिणवाहिनी अशा दोन्ही मार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू आहे. तरी नागरिकांना असे आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी त्यांच्या गंतव्य स्थानी पोहचण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा. आपल्या गंतव्य स्थानी जाण्यासाठी पूर्व द्रुतगती महामार्ग, पश्चिम द्रुतगती महामार्ग, अंधेरी घाटकोपर लिंक रोड, साकीविहार रोड, एमआयडीसी सेन्ट्रल रोड, हिरानंदानी लिंक रोड, सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड, सायन बांद्रा लिंक रोड यांचा वापर करावा असे आवाहन केले आहे.
जनता कॉलनी, जोगेश्वरी येथील नवीन भुयारी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम देखील ३१ मे पर्यंत चालू राहणार असल्याने या परिसरात नागरिकांना अजून मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो.
No comments yet.