महिलेचा पाठलाग करून, फोनवरून सतावणाऱ्या रोमिओला पवई पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या विधवा महिलेला वारंवार फोन करून आणि तिचा पाठलाग करून जेरीस आणणाऱ्या एका माथेफिरूला पवई पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. सतीश शिंदे (२४) असे या तरुणाचे नाव असून पवई येथील तुंगागाव परिसरात हा तरुण आपल्या आईसोबत रहावयास आहे.

यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला या एका खाजगी कंपनीत काम करतात. त्यांना आरोपी याने सोशल मिडियावर फ्रेंड रिक्वेस्ट केली होती. महिलेशी ओळख वाढवण्यासाठी त्याने केलेले मॅसेजवर महिलेने दाद दिली नव्हती.

“महिलेचा नंबर मिळवून तो तिला सतत फोन करून ओळख वाढवून बोलण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्यालाही तिने दाद दिली नव्हती. ज्यामुळे त्याने दिवस रात्र सतत फोन करण्यास सुरुवात केली असता, महिलेने आम्हाला याबाबत तक्रार दिली होती,” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले ‘याबाबत आम्ही त्याला गैरवर्तवणूक थांबण्याची समज दिली होती. मात्र त्याचे ते कृत्य चालूच असल्याची माहिती तक्रारदार यांनी दिली. आम्ही महिलेच्या मदतीने त्याला पवई तलावाजवळ बोलावून तो भेटायला आलेला असताना सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.”

महिलेच्या तक्रारीच्या आधारावर पवई पोलिसांनी भादवि कलम ३५४ ड नुसार गुन्हा नोंद करून शिंदे याला अटक केली आहे. अटक आरोपीने अशाच प्रकारचे कृत्य अजून कोणासोबत केले आहे का? याचा तपास पवई पोलीस करत आहेत.

 

, , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!