मुंबईत रिक्षाने फिरण्यासाठी आणि गंमत म्हणून रिक्षा चोरी करणाऱ्या २४ वर्षीय तरुणाला पवई पोलिसांनी शनिवारी बेड्या ठोकल्या आहेत. शाहदत हुसेन शहा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो पवईतील फिल्टरपाडा भागात राहतो.
पवईतील विविध भागातून रिक्षा चोरी झाल्याची तक्रार पवई पोलीस ठाण्यात नोंद झाली होती. साकीविहार रोड येथून रिक्षा क्रमांक एमएच ०३ बीवाय १५०९ आणि फिल्टरपाडा येथून रिक्षा क्रमांक एमएच ०२ ईएफ ५१७५ चोरी झाल्याने रिक्षा मालकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यासंदर्भात रिक्षा चालक-मालक संघटनानी पोलिसांकडे लवकरात लवकर त्या चोरट्यांना अटक करण्याची मागणी केली होती.
पवई पोलीस ठाण्याचे दोन्ही गुन्हेप्रकटीकरण पथक सीसीटीव्ही आणि खबरींच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेत होते. तपास सुरु असताना चोरीची रिक्षा घेवून शाहदत प्रवास करत असताना नाकाबंदीमध्ये पोलिसांनी त्याला रोखून त्याच्याकडे रिक्षाची कागदपत्रे आणि लायसन्सची मागणी केली असता दोन्ही त्याच्याकडे नसल्याने त्याला ताब्यात घेवून पोलीस ठाणे येथे आणण्यात आले.
पोलिसांच्या चौकशीत ती रिक्षा त्याची नसून, त्याने चोरी केल्याचे समोर आले. त्या अनुषंगाने अधिक चौकशीत साकीविहार रोड आणि फिल्टरपाडा येथील रिक्षा सुद्धा त्यानेच चोरी केल्याची कबुली दिली.
“केवळ गंमत आणि मजेसाठी तो रिक्षा चोरी करत असे. चोरीची रिक्षा मुंबईतील विविध ठिकाणी फिरवून पेट्रोल संपले किंवा कंटाळा आला कि, रस्त्यावर रिक्षा सोडून तो निघून जात असे,” असे या संदर्भात बोलताना पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेल्या दोन्ही रिक्षा हस्तगत केल्या आहेत.
No comments yet.