मुंबईकरांचे पवई पोलिसांच्या हद्दीत हरवलेले ५० महागडे मोबाईल फोन, ज्यांची अंदाजे किंमत ७ लाख रुपये आहे, ते परत मिळवण्यात पवई पोलिसांना यश आले आहे. पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकांनी हे कार्य केले. परत मिळवलेले सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना पोलीस उपआयुक्त परिमंडळ १० दत्ता नलावडे यांच्या हस्ते बुधवारी देण्यात आले.
मोबाईल हा आता माणसाची अत्यावश्यक गरज बनून राहिला आहे. मात्र अनेकदा मुंबईकर आपली ही गरज असणारा मोबाईल फोन कळत नकळत कोठेतरी विसरतात, गहाळ करतात किंवा चोरी होतात. असेच हरवलेले ५० मोबाईल फोन पवई पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे शोधून काढले आहेत.
एकदा हरवलेला मोबाईल कधीच मिळत नाही असा समजच लोकांमध्ये निर्माण झाला आहे. मात्र पाठीमागील काही वर्षात कुशल अधिकारी आणि तांत्रिक तपास याच्या जोरावर मुंबई पोलिसांनी ही बाब खोडून काढली आहे. लोकांचे हरवलेले हजारो मोबाईल शोधून काढत मुंबई पोलीस ते त्यांच्या मूळ मालकांना परत मिळवून देत आहेत. त्यामुळे नागरिकांनी असे काही घडल्यास आपल्या मोबाईलच्या संपूर्ण माहितीसह आपल्या जवळच्या पोलीस ठाण्यास याची माहिती द्यावी असे आवाहन मुंबई पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुप्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद लाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष कांबळे आणि पथकाने आयएमआय नंबर आणि तांत्रिक माहितीच्या आधारावर उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, दिल्ली, महाराष्ट्र आणि इतर राज्यातून हे मोबाईल ट्रेस करून त्यांना हस्तगत केले.
No comments yet.