सहाय्यक आयुक्तांनी उद्यान व मलनीसारण विभागाच्या अधिकाऱ्यांसह उद्यानाची पाहणी करून शौचालयाच्या वाहिनीला मालनिसारण वाहिनीशी त्वरित जोडण्याचे दिले आदेश
हिरानंदानी येथील आंब्रोसिया इमारतीजवळील पालिका उद्यानातील शौचालयाला मलनीसारण जोडणीला जोडण्यास पालिकेची परवानगी मिळत नसल्याने, त्याचे गोडाऊन झाल्याची बातमी आवर्तन पवईने केली होती. स्थानिक शाखाप्रमुख निलेश साळुंखे यांनी सुद्धा हा मुद्दा लावून धरत पालिकेला पत्रव्यवहार केला होता. याची दाखल घेत शुक्रवारी पालिका सहाय्यक आयुक्त चंदा जाधव यांनी उद्यान व मालनीसरण विभागाच्या अधिकाऱ्यांसह उद्यानाची पाहणी करून, शौचालयाच्या वाहिनीला मालनिसारण वाहिनीशी त्वरित जोडण्याचे आदेश दिले आहेत.
हिरानंदानी येथील आंब्रोसिया इमारतीच्या बाजूला असणाऱ्या भूखंड क्रमांक ७/२ वर लेक व्ह्यू डेव्हलोपर द्वारे विकसित केलेले पालिकेचे उद्यान आहे. उद्यानाच्या निर्मितीच्या वेळीच येथे येणाऱ्या लोकांच्या सुविधेसाठी शौचालयाची निर्मिती करण्यात आलेली आहे. मात्र शौचालय मलनिसारण वाहिनीला जोडले गेले नसल्याने ते वापरात नसून, त्याचे गोडाऊन झाले आहे. याची काळजीवाहू तत्वावर देखभाल करणाऱ्या लेक व्ह्यू डेव्हलोपरकडून केल्या जाणाऱ्या सततच्या पाठपुराव्यानंतरही पालिका ‘एस’ विभागातर्फे मलनिसारण वाहिनीला जोडण्यास लागणारी अनुमती मिळाली नव्हती. काही महिन्यांपूर्वीच हे उद्यान पालिकेला हस्तांतरित करण्यात आले आहे. पालिकेच्या देखभालीत तरी सर्व अडथळे दूर करत या उद्यानातील शौचालयाची सुविधा सुरु करण्यात यावी अशी मागणी पवईकरांकडून होत होती. आवर्तन पवईने “पालिका उद्यानातील शौचालय गेले चोरीला” या मथळ्या खाली बातमी करून पालिका प्रशासनाचे याकडे लक्ष वेधले होते. तसेच शिवसेना शाखा ११५ चे शाखा प्रमुख निलेश साळुंखे यांनी सुद्धा याचा पाठपुरावा करत पालिकेला पत्रव्यवहार केला होता.
या सर्वांची दखल घेत पालिका सहाय्यक आयुक्त चंदा जाधव यांनी सहाय्यक उद्यान अधीक्षक संजय राठोड, सहाय्यक अभियंता दिलीप अहिरे व आंबोरे यांच्यासोबत शुक्रवारी उद्यान भागास भेट दिली. परिस्थितीची पाहणी करून लवकरात लवकर शौचालयाच्या वाहिनीला मलानिसारण वाहिनीशी जोडण्याचे आदेश त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
या संदर्भात आवर्तन पवईशी बोलताना उद्यान विभागाचे सहाय्यक अभियंता आंबोरे यांनी सांगितले “उद्यानाच्या जवळपास पालिकेची मलनीसारण वाहिनी नसल्याने, मालनीसारण प्रकल्प विभागाला याची माहिती देवून त्वरित मुख्य वाहिनी शोधून आणि जरुरत पडल्यास त्यास जोडणारी नवीन वाहिनी टाकण्याचे काम करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. काम पूर्ण होताच शौचालय मुख्य मालनीसारण वाहिनीला जोडून सुरु करण्यात येईल.”
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
‘ आवर्तन पवई ‘ चा दणका !
सर्वसामान्यांच्या मूलभूत प्रश्नांना वाचा फोडुन त्यांच्या समस्यांचे निराकरण केल्याबद्दल ‘ आवर्तन पवई ‘ व विशेषता: निलेश साळुंखे यांचे आभार….!