पवई पोलीस ठाण्याचे (Powai police station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक (Senior Police Inspector) आबुराव सोनावणे यांची पदोन्नती झाल्यानंतर गेल्या महिनाभर रिक्त पवई पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी बुधन सावंत (SPI Budhan Sawant) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी दुपारी त्यांनी आपला हा पदभार स्वीकारला. यापूर्वी साकीनाका पोलीस ठाणे (Sakinaka Police Station) येथे कार्यरत असल्याने परिसराची माहिती आणि शांत स्वभावाचे अधिकारी या परिसराला लाभल्याने पोलीस कर्मचाऱ्यांचा कामाचा हुरूप वाढला आहे.
सावंत हे १९९५च्या बॅचचे अधिकारी असून, त्यांनी यापूर्वी डीएन नगर (D N Nagar), साकीनाका (Sakinaka), गुन्हे शाखा (Crime Branch) यासह मुंबईतील व्यस्त आणि अतिसंवेदनशील भागातील पोलीस ठाणे सोबतच ग्रामीण भागात सुद्धा काम केले आहे. हा दांडगा अनुभव पाठीशी घेऊन त्यांनी नुकताच पवई पोलीस ठाणेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदाचा पदभार सांभाळला आहे.
शहरी आणि ग्रामीण भागात पोलीस उपनिरीक्षक (police sub-inspector) ते पोलीस निरीक्षक (police inspector) अशा विविध पदांवर काम करत मिळालेला दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी असतानाच मुंबईतील सर्वांत व्यस्त पोलीस ठाण्यांपैकी एक असणाऱ्या साकीनाका पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक गुन्हे आणि पोलीस निरीक्षक जनसंपर्क अशा दोन्ही ठिकाणी त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे.
पवई पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत येणारा परिसर हा तसा शांत असला तरी, बाजूला असलेल्या आयआयटी मुंबई (IIT Mumbai) सारख्या संवेदनशील ठिकाणावर त्यांना विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. उच्चभ्रू वसाहत आणि चाळसदृश्य वस्त्या अशा दोन्ही भागाचा समावेश असणारा असा पवई परिसर आहे, त्यामुळे याचा समतोल साधत काम करणे. त्याचबरोबर दर दोन दिवसाला घडणाऱ्या ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांना (online cheating) रोखण्यासाठी जनजागृती आणि लक्ष देणे त्यांच्यासाठी आव्हान असणार आहे.
“२६ वर्षाच्या आपल्या कार्यकाळात रोज नवनवीन केसेस समोर येत. कधी एकदम साधी वाटणारी केस सुद्धा खूप मोठी असते, त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक प्रकरणाला व्यवस्थित हाताळण्यावर माझे लक्ष असणार आहे. मी नुकताच पदभार स्वीकारला आहे त्यामुळे परिसराबाबत अधिक बोलता येणार नाही, मात्र पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येक स्तरातील व्यक्तीशी संपर्क साधत त्यांच्या समस्या समजून घेवून त्यांच्यासाठी चांगले काम करायचे आहे.” असे आवर्तन पवईशी बोलताना सावंत यांनी सांगितले.
वपोनि सावंत यांनी पदभार स्विकारल्यानंतर पवईतील विविध पक्ष- संघटनेचे व मंडळांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांची भेट घेऊन पवईतील नानाविध समस्यांवर चर्चा केली.
No comments yet.