पवईकराच्या लोणावळ्यातील एका व्हिलाच्या छायाचित्रांचा वापर करून बनावट जाहिरात आणि आयडी तयार करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या २१ वर्षीय विद्यार्थ्याला पवई पोलिसांनी पुणे येथून अटक केली आहे. बांद्रा येथे निर्माण करण्यात आलेल्या सायबर युनिटच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. आकाश जाधवानी असे अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. व्हिला बुकिंगसाठी मोठी सूट देत डझनभरापेक्षा जास्त पर्यटकांना त्याने लाखापेक्षा अधिक रुपयांना गंडा घातला होता.
ट्रॅव्हल आणि टुरिझमचे शिक्षण घेत असलेल्या आकाशने आपल्या काही मित्रांसोबत लोणावळा आणि महाबळेश्वर येथील रिसॉर्ट्समध्ये पार्टी करण्यासाठी फसवणुकीचा हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. मिळालेल्या पैशातून त्याने महागडे मोबाईल फोन आणि कपडे खरेदी केले आहेत. आकाशने अजूनही काही खोट्या जाहिराती तयार करून नागरिकांची फसवणूक केली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
पवईकर आशिष लोणंदकर यांच्या परिवारातील मालकीचा लोणावळा, पावना येथे ५ बीएचके व्हिला आहे. ते स्वतः तो व्हिला सांभाळतात व सुट्टीसाठी येणाऱ्या लोकांना भाड्याने देतात. यासाठी ते वैयक्तिकरित्या बुकिंग करतात. फेब्रुवारी महिन्यात एका व्यक्तीने फोन करून एका ट्रॅव्हल वेबसाइटवर त्यांच्या व्हिलाची जाहिरातीवर पाहून बुकिंग केले असल्याचे सांगितले. काही व्यक्तींनी तर थेट व्हिलाच्या ठिकाणी पोहचत त्यांनी या व्हिलाची ऑनलाईन बुकिंग केली असून, पैसे सुद्धा दिले असल्याचे सांगितले. मात्र, लोणंदकर यांनी यापैकी कोणतीच बुकिंग केली नव्हती.
नमूद संकेतस्थळावरील जाहिरात त्यांनी तपासली असता त्यांना आढळून आले की, कोणीतरी अज्ञात इसमाने हर्ष या नावाने त्यांच्या व्हिलाचे फोटो वापरून एक जाहिरात वेबसाइटवर टाकली आहे. तो मोठ्या प्रमाणात सूट देवून बुकिंगसाठी अॅडव्हान्स पैसे सुद्धा घेत आहे. या घोटाळ्याबद्दल समजताच त्यांनी पवई पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती.
अतिरिक्त पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त (परीमंडळ ९) अभिषेक त्रिमूखे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर युनिटचे अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सविता शिंदे, उपनिरीक्षक विजय वागारे, कॉन्स्टेबल संग्राम जाधव आणि पवई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय दळवी यांनी तांत्रिक माहितीच्या आधारावर आकाश याला पुणे येथून १५ मार्च रोजी अटक केली.
पोलिसांनी आकाशकडून पर्यटकांकडून बुकिंगच्या नावावर घेतेलेले ७५ हजार रुपये हस्तगत केले असून, त्याला कोर्टात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
No comments yet.