‘शालू’, भारतात बनवलेला जगातील पहिला आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्युमनॉइड रोबोट टीचर, जगाच्या इतर भागातही लोकप्रिय होत आहे. केंद्रीय विद्यालय आयआयटी बॉम्बे येथील शिक्षक दिनेश कुंवर पटेल यांनी ४७ भाषा बोलता येणाऱ्या आणि समजणाऱ्या शालूची निर्मिती केली आहे.
पटेल यांना नुकत्याच बँकॉक, थायलंड येथे आयोजित वर्ल्ड सिआयओ समिट २०२२मध्ये आमंत्रित करण्यात आले होते. २२ ते २४ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत झालेल्या वर्ल्ड सिआयओ समिट २०२२मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर काम करणाऱ्या ४० देशांच्या प्रतिनिधींना बोलावण्यात आले होते. जिथे पटेल यांना तांत्रिक वक्ता म्हणून बोलण्याची संधी मिळाली. या दरम्यान पटेल यांना लक्षात आले की त्यांनी निर्मित केलेली ‘शालू टीचर’ त्यांच्यापेक्षा जास्त लोकप्रिय आहे.
शालू ९ भारतीय आणि ३८ परदेशी भाषा बोलू आणि समजू शकते. विद्यार्थ्यांना चांगले शिकवण्यासोबतच ती त्यांच्या प्रश्नांची उत्तरेही देते.
पटेल म्हणाले की, मला हे पाहून आश्चर्य वाटले की तेथे उपस्थित असलेल्या बहुतेक लोकांना माझ्याबद्दल माहिती नसेल पण त्यांना शालूबद्दल माहिती आहे. जे काम तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठमोठ्या कंपन्या त्यांच्या सर्व साधनसामग्रीचा वापर करूनही करू शकल्या नाहीत, ते काम पटेल कसे करू शकले, हे पाहून लोकांनाही आश्चर्य वाटले.
पटेल हे मूळचे उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील मडियाहुनच्या राजमलपूर गावचे रहिवासी आहेत. एका छोट्या गावातून बाहेर पडून आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा मान पटेल यांना मिळाला आहे. पटेल यांना शालूला या कार्यक्रमात घेऊन जाण्याची इच्छा होती, मात्र तांत्रिकदृष्ट्या ते शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी कार्यक्रमात उपस्थित लोकांना शालूचा रेकॉर्ड केलेला व्हिडिओ दाखवला. जो पाहून उपस्थित सर्व खूपच प्रभावित झाले.
ऑगस्ट महिन्यात आंतरराष्ट्रीय ऑटोमेशन एक्सपो २०२२च्या उद्घाटन समारंभात पटेल यांना आंतरराष्ट्रीय मंचावरून जगाला संबोधित करण्याची संधी मिळाली होती.
No comments yet.