पवई पोलिसांच्या अखत्यारीत चोरट्यांनी एक मोबाईल दुकान फोडून दुकानातील ८० मोबाईल चोरले आहेत. या चोरीस गेलेल्या मोबाईल्सची किमंत १५ लाखापेक्षा अधिक असून, पवई पोलीस याबाबत चोरीचा गुन्हा नोंद करून अधिक तपास करत आहेत.
यासंदर्भात पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार प्रवीण जैन यांचे पवई पोलिसांच्या अखत्यारीतील विजयनगर भागात दी मोबाईल वर्ल्ड नामक मोबाईलचे दुकान आहे. बुधवार, ८ मार्चला रात्री जैन यांनी नेहमीप्रमाणे आपले दुकान बंद करून ते घरी निघून गेले. “९ मार्चला सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ते दुकान उघडण्यास आले असता त्यांना दुकानाच्या शटरच्या कडीचा भाग तुटलेला आढळून आला. त्यांनी दुकानात प्रवेश करून पाहिले असता दुकानातील सामान विस्कटलेल्या अवस्थेत असून दुकानातील काही किमती मोबाईल्स गायब असल्याचे समोर आले,” असे पवई पोलिसांनी सांगितले.
दुकानात चोरी झाले असल्याचे लक्षात येताच त्यांनी पवई पोलिसांना याबाबत माहिती देत तक्रार दाखल केली.
“चोरट्यांनी दुकानाच्या शटरला टाळे लावण्यासाठी असणाऱ्या दोन्ही बाजूच्या कड्या तोडून दुकानात प्रवेश केला होता. दुकान मालकाच्या जवाबानुसार दुकानातील आयफोनसह ८०च्या आसपास मोबईल चोरट्यांनी चोरी केले आहेत. विशेष म्हणजे चोरट्यांनी दुकानाच्या गल्ल्याला अजिबात हात लावलेला नाही. दुकानात सीसीटीव्ही नसल्याने फुटेज मिळून आले नाही,” असे तपासी अधिकाऱ्याने सांगितले.
“परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एका रिक्षातून आलेले ३ इसम दुकानाच्या आसपासच्या भागात संशयास्पदरित्या फिरताना दिसत आहेत.” पोलीस निरीक्षक गुन्हे गणेश पाटील यांनी आवर्तन पवईशी बोलताना सांगितले.
यासंदर्भात जैन याने दिलेल्या तक्रारीवरून भादवि कलम ३८०, ४५४, ४५७ नुसार गुन्हा नोंद करून, पवई पोलीस घटनास्थळी मिळालेले पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेज यांच्या आधारावर रिक्षा आणि आरोपींचा शोध घेत आहेत.
No comments yet.