@प्रमोद चव्हाण
झुम कार कंपनीची हुंडाई क्रेटा मोटार कार पवई येथून भाड्याने बुक करून, तिचे जिपीएस. सिस्टम काढून चोरी करणाऱ्या टोळीतील दोन सदस्यांना पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. जगदिश सोहनराम बिष्णोई (२३) आणि महेंद्र रतीराम गोदारा (१९) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पवई पोलिसांनी चोरी केलेल्या ६ गाड्या राजस्थान येथून ताब्यात घेतल्या आहेत. या दोघांच्या अटकेमुळे मुंबई, महाराष्ट्रसह देशभर अशाप्रकारे कार चोरी करणाऱ्या राज्यस्तरीय टोळीचा पर्दाफाश झाला असून, येणाऱ्या काळात अजूनही काही कार मिळून येण्याची शक्यता आहे.
झुम कार कंपनीचे फिल्ड एक्सीक्युटीव्ह धिरज मौर्या यांनी त्यांच्या कंपनीची कार (केए ०३ एएफ ०७८८) भाड्याने बुक करून तिचे जिपीएस काढून टाकून चोरी केल्याची तक्रार पवई पोलीस ठाण्यात दाखल केली होती. “कार ताब्यात घेणाऱ्यास कार ताब्यात घेतेवेळी कारचे फोटो घेऊन कंपनीला पाठविणे आवश्यक असते. या फोटोमध्ये कारच्या काचेच्या रिफ्लेक्शनमध्ये आरोपींचे फोटो प्राप्त झाले होते. त्या आधारे कार कंपनीसोबत संपर्क ठेवत कार बुक करणाऱ्या लोकांवर आमची नजर होती.” असे याबाबत बोलताना पोलीस उपायुक्त परिमंडळ १० डॉ महेश्वर रेड्डी यांनी सांगितले.
“तपास सुरु असताना एका संशयित इसमाने २७ डिसेंबर रोजी राजस्थान येथे जाण्यासाठी कार बुक केल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्याच्या आधारे आम्ही पाळत ठेवून पवईतील कस्टम कॉलोनी भागातून त्याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत अजून एक सहकाऱ्यासोबत तो कार चोरी करून राजस्थान येथे घेवून जात असल्याची त्याने माहिती दिली.” असे यासंदर्भात बोलताना तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक यश पालवे यांनी सांगितले.
राजस्थान येथून ६ गाड्या हस्तगत
आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारावर दोन्ही आरोपींसह तपासी अधिकारी पालवे, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी विनोद लाड, पोलिस हवालदार मोहोळ, पोलिस नाईक जगताप, पोलिस नाईक गलांडे, पोलीस शिपाई कदम, पोलीस शिपाई कट्टे यांचे एक पथक राजस्थान येथे रवाना करण्यात आले होते. “मतोडा, लोहावट, फलोदी, भोजासर, जोधपुर इत्यादी राजस्थानातील गावात तपास करून झुम कार कंपनीच्या दोन क्रेटा, एक आय २०, दोन स्विफ्ट, एक ब्रिझा अशा एकूण ६ मोटार कार हस्तगत करण्यात आल्या आहेत. हस्तगत कार या मुंबईसह मध्यप्रदेश व गुजरातमधुन चोरी झालेल्या झुम कार कंपनीच्या गाड्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. चोरी केलेल्या कारचे रंग बदलून, बनावट वा विना नंबर प्लेटने वापर केला जात होता. असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दळवी यांनी सांगितले.
गुन्ह्याची कार्यपध्दती
अटक आरोपी व त्यांचे सह साथिदार हे उलवे नवी मुंबई येथे गॅस सिलेंडर डिलीव्हरीचे काम करीत होते. लॉकडाऊन सुरू झाला त्यावेळेस मार्च २०२०मध्ये त्यांनी सर्वप्रथम नवीमुंबई ते त्यांच्या राजस्थान येथील मूळ राहते गावी जाणेकरिता झुम कार कंपनीची गाडी बुक केली होती. फलोदी, नागोर चैराहा राजस्थान येथे सदर गाडीचे जिपीएस सिस्टम काढून गाडी स्वतःच्या फायद्यासाठी वापरू लागले होते. यानंतर त्यांना याची चटक लागली आणि राज्याच्या सिमा खुल्या होताच आरोपी व त्यांचे इतर साथिदार ट्रॅव्हल्सने राजस्थान येथून मुंबई, नवीमुंबई, गुजरात, मध्यप्रदेश अशा वेगवेगळ्या ठिकाणी गेले होते. “इतरांच्या नावाचे सिमकार्ड, आयडी प्रुफ, ड्रायव्हींग लायसन्स तसेच बॅंक ट्रान्झेक्शन करून झुम कार कंपनीच्या गाड्या भाड्याने बुक केल्या. स्वतःची ओळख उघड होणार नाही याची सर्व काळजी आरोपींनी घेतली होती.” असे याबाबत बोलताना गुन्हे प्रकटीकरण अधिकारी विनोद लाड यांनी सांगितले.
“गाडी बुक केल्यानंतर बुक करणाऱ्या व्यक्तीला एक कोड पाठवला जातो ज्याच्या आधारावर गाडीचे दरवाजे उघडले जातात. दरवाजा उघडल्यानंतर गाडीत असणाऱ्या चावीच्या मदतीने गाडी तुम्ही इच्छित स्थळी घेवून जावू शकता. जीपीएसद्वारे कंपनी सदर वाहनांवर नजर ठेवते. याचाच फायदा घेवून आरोपींनी गाडी चोरी करून राजस्थान येथे घेवून जावून तिचे जीपीएस काढून टाकून, अवैद्य वापरासह, इतर गुन्ह्यात सुद्धा त्याचा वापर केला आहे. तसेच काही गाड्या विकल्या सुद्धा आहेत.” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.
सदर कारवाई पोलीस उपआयुक्त परिमंडळ १० डॉ महेश्वर रेड्डी, सहाय्यक पोलीस आयुक्त साकीनाका विभाग दिनेश देसाई, पवई पोलीस ठाणे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दळवी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिलीप धामुणसे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक यश पालवे, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलिस उपनिरीक्षक विनोद लाड यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी ही कारवाई केली.
No comments yet.