पर्यटकांचे खास आकर्षण असणाऱ्या पवई तलावाची पाठीमागील काही वर्षात दुर्दशा होत चालली आहे. पवई तलावात सोडले जाणाऱ्या सांडपाण्यामुळे पाणी दूषित होवून तलावात जलपर्णी निर्माण झाल्या आहेत. तलावाच्या किनाऱ्यावरील सुशोभिकरण दुर्लक्षित झाल्याने नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. पालिका आणि प्रशासन यांच्या दुर्लक्षामुळे पवई तलावाला हे दिवस भोगावे लागले आहेत. मात्र आता या संकटापासून तलावाला मुक्ती मिळणार असून, स्थानिक आमदार दिलीप (मामा) लांडे यांच्या पाठपुराव्यानंतर आज, सोमवारपासून हार्वेस्टरच्या माध्यमातून पवई तलावातील जलपर्णी (हायसिंथ) काढण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.
आमदार दिलीप मामा लांडे यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ सोमवारी पवई तलाव मुख्य गणेश घाट येथे पार पडला. लांडे यांनी स्वतः हार्वेस्टर चालवत जलपर्णी काढून या कामाचा शुभारंभ केला. यावेळी प्रभाग क्रमांक १२१ नगरसेविका चंद्रावती मोरे, नगरसेवक अशोक माटेकर, माजी नगरसेवक ईश्वर तायडे, शाखाप्रमुख मनीष नायर, शाखाप्रमुख सचिन मदने, हिरानंदानी रेसिडेंट असोसिएशनचे अध्यक्ष संजय तिवारी, पोलीस निरीक्षक (पवई पो. ठाणे) विजय दळवी, पवई तलावाच्या स्वच्छतेसाठी काम करणाऱ्या निसर्ग आणि एचएचएच संस्थेचे कार्यकर्ते, शिवसैनिक आणि पवईकर उपस्थित होते.
तलावाच्या सुशोभिकरण आणि साफसफाईसाठी पालिकेने कोट्यावधी रुपये खर्च केले आहेत. मात्र सुशोभिकरण प्रकल्पांतर्गत तयार करण्यात आलेले संगीत कारंजे बंद पडले आहेत. धावण्यासाठी, चालण्यासाठी बनवलेले ट्रॅक, कठडे यांची मोडतोड होत वाताहत झाली आहे. लोखंडी सुरक्षा कुंपणे तुटली आहेत. तलावाला जलपर्णीने व्यापले आहे. यामुळे पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण कमी होऊन जैवविविधतेला धोका निर्माण झाल्याची भीती पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त होत आहे.
१९ सप्टेंबर २०१९ला पालिका हायड्रोलिक विभागाच्या अधिकाऱ्यांची पवईतील नागरिकांच्यावतीने एका प्रतिनिधी मंडळाने घाटकोपर येथील कार्यालयात भेट घेवून चर्चा केली होती. तसेच होणाऱ्या हानीची परिस्थिती पाहता स्वच्छतेच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करण्याची मागणी केली होती.
तलावाची दिवसेंदिवस होत चाललेली दुर्दशा सावरण्याचा खटाटोप करणाऱ्या पालिका प्रशासनाने त्याच्या स्वच्छतेचे काम आणि ५ वर्ष त्याच्या देखभालीचे काम ७.१५ करोड खर्च करून २०१५मध्ये किंजल कंस्ट्रक्शन या कंपनीला दिले होते. मात्र सुरुवातीचे काही दिवस वगळता कोविड महामारी आणि इतर कारणांनी हे काम रखडले होते. मात्र आता तलावाच्या स्वच्छतेच्या कामाला परत सुरुवात झाली आहे.
“या तलावाशी लोकांच्या धार्मिक भावना जोडल्या गेल्या आहेत. गणेश विसर्जन, दुर्गा विसर्जन, छटपूजा तसेच हिंदू धर्माप्रमाणे सुख-दुःखाचे अनेक कार्यक्रम येथे केले जातात. हिंदू धर्माच्या या भावना लक्षात घेत गेली अनेक वर्ष या तलावाच्या स्वच्छतेचे काम केले जावे म्हणून मी प्रयत्न करत होतो. यापूर्वी टेक्नीकल पद्धतीने यासाठी काम सुरु करण्यात आले होते, मात्र होणारा विरोध पाहता पारंपारिक पद्दतीने हार्वेस्टरच्या माध्यमातून तलावातील जलपर्णी वनस्पती काढण्याच्या कामाला आजपासून सुरुवात झाली आहे.” असे याबाबत बोलताना आमदार लांडे म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “सहा महिने हे काम चालणार असून, तलावातील जलपर्णी बाहेर काढून सुकल्यानंतर त्यांची योग्य विल्हेवाट लावण्याची जबाबदारी या प्रकल्पात असणार आहे. तसेच येथील रहिवाशी परिसरातून सोडले जाणारे घाण पाणी हे तलावात येणाऱ्या जलपर्णीचे मुख्य कारण आहे. या घाण पाण्याची व्यवस्था केली जावी यासाठी टेंडर काढण्यात आले आहे त्याचे काम लवकरात लवकर सुरु करण्यासाठी आम्ही मागणी केली आहे.”
“तलावाच्या वाढत जाणाऱ्या जलपर्णी काढून स्वच्छतेसाठी नागरिकांच्या तक्रारी येत होत्या. ज्याचा मी आमदार दिलीप मामा लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेकडे पाठपुरावा करत होते. अखेर आज या कामाची सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांचे आकर्षण असणारे त्यांचे हक्काचे पर्यटन स्थळ त्यांना सुयोग्य अवस्थेत परत मिळणार आहे.” असे यासंदर्भात बोलताना स्थानिक नगरसेविका आणि बाजारसमिती अध्यक्षा चंद्रावती मोरे म्हणाल्या.
“लोकांच्या भावनांचा आदर करून परिसराचे सुशोभिकरण, परिसरात येणाऱ्या लोकांची सुरक्षा आणि इतर गोष्टींचा विचार करता या परिसरात सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी देखील आम्ही केली असून त्यासाठी पाठपुरावा सुरु आहे,’ असे यावेळी बोलताना मनीष नायर यांनी सांगितले.
पालिका हायड्रोलिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत बोलताना सांगितले कि, “तलावातील जलपर्णी काढणे, आणि स्वच्छतेचे काम या रक्कमेतून केले जाणार आहे. या स्वच्छता उपक्रमांतर्गत तलावाची ढासळत चाललेली स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
No comments yet.