मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात तरुणीला अटक; भंगारात मिळाली मोटारसायकल

मोटारसायकल चोरी म्हणजे पुरुषाचा सहभाग असा समज आहे. पवई येथील एका मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात मात्र या उलट घडले आहे. पवई पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात एका २१ वर्षीय तरुणीला अटक केली आहे. पवई पोलिसांनी देवनार डम्पिंग ग्राउंड येथून तिने चोरी केलेली गाडी हस्तगत केली आहे.

२६ वर्षीय तक्रारदार किरण पठाडे हे स्विगीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात. पार्कसाईट येथून काहीच दिवसांपूर्वी पवईतील मोरारजी कंपाऊंड येथे ते रहावयास आले होते. २१ सप्टेंबर रोजी पठाडे नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी निघाले. यावेळी त्यांनी आपल्याच परिसरात हनुमान रोड येथे पार्क केलेली त्यांची होंडा शाईन मोटारसायकल क्रमांक एमएच ०३ बियू २२४४ तिथे नसून कोणीतरी चोरी केल्याचे समोर आले. या यासंदर्भात पठाडे यांनी पवई पोलीस ठाण्यात भादवि कलम ३७९ नुसार गुन्हा नोंद केला होता.

पोलीस तपासात सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शी काहीच मिळून आले नव्हते. अभिलेखावरील गुन्हेगार आणि आसपासच्या परिसरातील गुन्हेगार सगळ्यांची चौकशी करण्यात आली मात्र कोणताच सुगावा लागू शकला नव्हता. तक्रारदार याने यात आपल्या आधीच्या प्रेमिके विषयी शंका व्यक्त केली होती.

“तक्रारदार याचे काही जवळचे मित्र आणि पूर्व प्रेमिका यांच्यातील कॉमन मित्रांकडे आम्ही चौकशी करत असताना त्याची पूर्व प्रेमिका समिना खान (बदललेले नाव) हिचा सहभाग समोर आला,” असे आवर्तन पवईशी बोलताना गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद लाड यांनी सांगितले.

“चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली देताना आपला पूर्व प्रेमी (तक्रारदार) तिच्याशी संबंध तोडून तिच्यापासून दूर जात असल्याने त्याला आपल्याकडे पुन्हा आणण्यासाठी त्याच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेले त्याची मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली,” असे पवई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.

भंगारात मोटारसायकल

आरोपी तरुणीने दाखवलेल्या जागेवर मोटारसायकल ताब्यात घेण्यासाठी पोलीस गेले असता, मोटारसायकल तिथे मिळून आली नाही. “सहज म्हणून आम्ही तिथे तांदूळ निवडत बसलेल्या एका महिलेला काही प्रश्न केले आणि आम्हाला मोटारसायकल असल्याच्या जागेची लिंक मिळाली. बेवारस वाहन म्हणून वाहतूक आणि पालिका विभागाने उचललेल्या गाडींमध्ये या मोटारसायकलचा देखील समावेश होता. पालिकेला पत्र देत आम्ही देवनार डम्पिंग ग्राउंड येथून मोटारसायकल ताब्यात घेण्याची प्रोसेस सुरु केली आहे.” असेही लाड म्हणाले.

वरिष्ठ पोलीस निरिक्षक बुधन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद लाड, पो.ह. दामू मोहोळ, पो.ना. वैभव पाचपांडे, पो.ना. प्रवीण सावंत, पो.शि. भरत देशमुख, पो.शि. सुर्यकांत शेट्टी, पो.शि. भास्कर भोये, पो.शि प्रशांत धुरी आणि महिला पोलीस शिपाई शितल लाड यांच्या पथकाने गुन्हा उघडकीस आणला.

, , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!