बेजाबदारपणे उभ्या शालेय बस आणि पालकांच्या गाड्यांमुळे पवईमध्ये वाढतोय वाहतूक कोंडीचा प्रश्न

sm shetty trafficशैक्षणिक वर्षाचा शाळेचा पहिला दिवस उजाडला आणि पवईच्या रस्त्यांवर ‘राजा उदार आन जनता बेजार’ अशी अवस्था सकाळी सकाळी पवईकरांनी अनुभवली. कामाला जाणाऱ्यांची गडबड आणि त्यात शाळेत मुलांना घेवून येणारे बस चालक आणि पालक अशा दोघांनीही शाळेच्या आवारात भर रस्त्यांवर लावलेल्या गाड्यांमुळे पवईचे सगळे रस्ते सकाळी-सकाळी ‘हाउस फुल्ल’ झाले होते. आधीच पावसाळ्यात गाड्यांच्या कमी झालेल्या वेगांवर या गर्दीने जसा अंकुश लावला होता. साकिनाका वाहतूक पोलिसांना सुद्धा नियंत्रण ठेवणे अवघड पडल्याने अखेर पवई पोलिसांनी रस्त्यावर उतरून ठिकठिकाणी वाहतूक नियंत्रणाचे काम केले.

जोगेश्वरी-विक्रोळी जोड रस्त्याच्या निर्मितीमुळे पवईला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे, पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या या रस्त्यामुळे पवईमध्ये वाहनांची गर्दी दिवसेंदिवस वाढत असतानाच वेळ वाचवण्यासाठी लोकांनी हिरानंदानी मार्गे चांदिवली-घाटकोपरला जोडणाऱ्या निर्माण केलेल्या नव्या रस्त्यामुळे आता हिरानंदानी आणि आसपासच्या परिसरातसुद्धा तुफान वाहतूक कोंडी वाढू लागली आहे. चांदिवली फार्म रोड वर वाहनाच्या रांगा वाढल्या की लेक होम मार्गे हिरानंदानीत जाण्याचा मार्ग अनेकजण निवडतात आणि बघता बघता संपूर्ण पवईला वाहतूक कोंडीचा विळखा पडतो. आता आधीच वाढलेल्या वाहतूक कोंडीत भर घालायचे काम करतायत ते शाळेत आपल्या पाल्याला सोडायला येणाऱ्या पालकांच्या गाड्या आणि शाळेच्या बसेस.

पवईत अनेक शाळा, महाविदयालये ही उपरस्त्यांवर किंवा दोन परिसरांना जोडणाऱ्या रस्त्यांवर आहेत, त्यामुळे शाळा भरण्याच्या वेळेस या रस्त्यांवर विद्यार्थ्यांना घेवून आलेल्या बसेस आणि पालकांच्या गाड्यांची गर्दी असते, त्यातच सामान्य वाहतूक चालू असते. यात जर जबाबदारीने कर्तव्य पार पाडली तर वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण होणे शक्य नसते. परंतु शाळेत विद्यार्थ्यांना घेवून येणाऱ्या बसेस आणि पालकांच्या गाड्या या प्रवेशद्वाराच्या समोर भर रस्त्यावर उभ्या करून विद्यार्थी चढे-उतरे पर्यंत तशाच उभ्या असल्याने संपूर्ण परिसरात गाड्यांच्या रांगाच्या रांगा लागत आहेत आणि हि प्रत्येक वर्षाची कहाणी होऊन बसली आहे.

काल १५ जूनला नव्या शैक्षणिक वर्षाचा शाळेचा पहिला दिवस उजाडला आणि गेली २ महिने मोकळा श्वास घेणाऱ्या पवईच्या रस्त्यांवर कामाला घाईगडबडीने निघालेली लोक, शाळेच्या बसेस आणि पालकांच्या गाडया असे सगळे काही एकसाथ रस्त्यांवर उतरल्याने अगदी दुपार पर्यंत पवईतील विविध परिसरांना जोडणाऱ्या रस्त्यांचा श्वास कोंडला गेला होता. या सगळ्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी वाहतूक पोलीस आटोकाट प्रयत्न करत होते, पण जसजसा सूर्य वर चढत होता तसतशी वाहतूक कोंडी वाढत जात होती. शेवटी गस्तीवर असलेल्या पवई पोलिसांच्या काही लोकांनी वाहतूक पोलीसांसोबत मोर्चा सांभाळत वाहतूकीची कोंडी फोडली आणि रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला.

याबाबत एस. एम. शेट्टी स्कूल प्रशासन तर्फे बोलताना सुभाष पंडित यांनी सांगितले “आमच्या सर्व बसेस कंत्राट पद्धतीने आहेत, आम्ही त्यांना फक्त शाळा सुटण्याच्या वेळेसच गाड्या शाळेच्या परिसरात उभ्या करण्याची सूचना दिल्या आहेत. पालकांना सुद्धा पाल्याला सोडायला येताना किंवा घ्यायला आल्यावर गाडी प्रवेशद्वारावर उभी करण्यास मनाई केली आहे. पाठीमागील २-३ वर्षापूर्वी वाढलेल्या समस्येला पाहता आम्ही वाहतूक विभागाला पत्र लिहून याबाबत कळवले होते तेव्हा पासून २ वाहतूक पोलीस आमच्या शाळा सुटण्याच्या आणि भरण्याच्या वेळेस परिसरात उपस्थित राहून नियंत्रण करतात. तरी लोकांच्या तक्रारी पाहता आम्ही अजून खबरदारी घेवू.

गोपाल शर्मा शाळेने या बाबत उत्तर देताना सांगितले कि, “आमची कोणतीच बस रस्त्यावर उभी राहत नसून शाळेच्या पटांगणात उभ्या राहतात, तिथेच मुलांची बसमध्ये चढण्या उतरण्याची सोय आहे. परिसरात शाळेत मुलांना घेवून येताना स्थानिकांना त्रास होत असल्याबद्दल सुद्धा अजून कोणतीच तक्रार आमच्याकडे आली नाही आहे. तशी कोणती तक्रार आल्यास आम्ही नक्की सुधारणा करू.”

याबाबत साकिनाका वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक खरात यांनी आवर्तन पवईशी बोलताना सांगितले “आम्ही शाळांना वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत कि रस्त्यांवर मुलांना बस मध्ये चढू किंवा उतरू देऊ नये, त्यांनी शाळेच्या आवारातच त्यांच्या गाड्या उभ्या करून मुलांची सोय करावी. गाड्या नंतर विजय विहार समोरील मोकळ्या जागेत उभ्या कराव्यात, परंतु शाळा केवळ एक दिवस सूचनेचे पालन करतात आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा जैसे थे. आज पुन्हा आम्ही अडचण करणाऱ्या सर्व शाळांना याबाबत सूचना देतो आणि परिसरात या सगळ्या कारणांनी वाहतूक कोंडी होणार नाही याबाबत खबरदारी घेतो.

, , , , , , , , , , , , , , , , ,

3 Responses to बेजाबदारपणे उभ्या शालेय बस आणि पालकांच्या गाड्यांमुळे पवईमध्ये वाढतोय वाहतूक कोंडीचा प्रश्न

  1. Pramod Chavan June 16, 2015 at 9:15 am #

    हा नुसता त्रास नाही तर डोकेदुखी होऊन राहलेला विषय आहे. आपल्या पाल्याच्या प्रेमापोटी ते सामान्य जनतेला किती त्रास देत असतात हेच त्यांना लक्षात येत नाही. सकाळी गाड्यांच्या रांगा अगदी चांदिवली, आदि शंकराचार्य मार्ग आणि अर्ध्या हिरानंदानित पोहचलेल्या असतात. भावनेच्या भरात स्थानिक नागरिक दुर्लक्ष करतात आणि हे त्याचाच फायदा उचलतात. वाहतूक विभागाने याकडे लक्ष देणे अत्यावश्यक झाले आहे.

  2. Amol Prabhu June 16, 2015 at 9:01 am #

    yes right …if we go any of the schools in powai ..as example Hiranandani School ..S.M. Shetty High school , IBS potdaar or Powai English high School , already the School buses and school vehicles are parked in side lanes and literate well educated parents who come to receive their kids park there vehicles right on the road makes 2 lanes right in the middle of the road …Maximum Women and drivers who come to receive , they create hell lot of traffic by doing all this for 1 hour for sure..i myself many times stood in between the road to clear the traffic but educated people sometimes are of no use and start arguing instead of understanding…and cannot even argue because women …but this has to be sorted out…Thank you Powai Avartan for getting this news and topic in front…

  3. nayana June 16, 2015 at 8:36 am #

    खरच सकाळी सोमवार ते शुक्रवार या दिवसां मध्ये खुपच त्रास सहन करावा लागतो. आणी मग रिक्षा सुध्दा मिळत नाही. मग एकच पर्याय चालत जाणे.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!