वाहतूक कोंडीचा ‘महामार्ग’; जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर गर्दीच्या काळात व्यावसायिक तीन चाकी वाहनांना बंदी

जोगेश्वरी विक्रोळी लिंकरोडवर (जेव्हीएलआर) वाहतुक कोंडीचा ताण कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी केलेल्या प्रयोगाच्या निमित्ताने सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या काळात जोगेश्वरी-विक्रोळी लिंकरोड वापरण्यास हलक्या व मध्यम व्यावसायिक तीन चाकी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. सध्या सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे आणि या मार्गावरून चालणाऱ्या वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे जेव्हीएलआरच्या दोन्ही मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. व्यावसायिक तीन चाकी वाहने त्यांच्या संख्येमुळे वाहतुकीस अडथळा आणत असल्याचे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे. ज्याचा विचार करता हा निर्णय घेण्यात आला आहे.

हलक्या व मध्यम तीन चाकी व्यावसायिक वाहनांना सकाळी ८ ते ११ दरम्यान आणि संध्याकाळी ५ ते सायंकाळी ८ या दरम्यान जेव्हीएलआरच्या दोन्ही मार्गावर बंदी घालण्यात आली आहे.

वाहतूक पोलिसांतर्फे केला जाणारा ३० दिवसांचा हा प्रयोग आहे. निर्णयाच्या अंमलबजावणीनंतर वाहतूक कोंडीच्या समस्येत झालेल्या परिणामाच्या तपासणीनंतर अंतिम अधिसूचनेबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

रुग्णवाहिका, पोलिस वाहने, अग्निशमन दलाची वाहने, शासकीय व निम शासकीय वाहने, दूध, भाजीपाला, ब्रेड, औषधे, बेकरी उत्पादने, एलपीजी, पेट्रोलियम उत्पादने आणि पिण्याचे पाणी यासारख्या जीवनावश्यक वस्तू पुरवठा करणाऱ्या वाहनांना हा निर्बंध लागू होणार नाही.

मागील वर्षी जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे ठराविक वेळेत जेव्हीएलआरसह मुंबईतील सर्वच रस्त्यांवर बससह अवजड वाहनांना यापूर्वीच प्रतिबंधित करण्यात आले आहे.

जेव्हीएलआर पाठीमागील काही वर्षात निव्वळ वाहतूककोंडीसाठी ओळखला जाऊ लागला आहे. पावसामुळे ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि त्यात मेट्रो कामाची भर यामुळे हा रोड खूपच अरुंद झाला आहे. मुंबईकरांचे या मार्गाने वाहन चालवताना कौशल्य पणाला लागत आहे. सदैव वाहतूककोंडी, कर्णकर्कश आवाज, प्रदूषण हेच आता या मार्गाचे वैशिष्ट्य बनून राहिले आहे.

मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा जेव्हीएलआर हा महत्वाचा दुवा आहे. या मार्गावरून दिवसभरात लाखो वाहने प्रवास करत असतात. पहाटे ८ नंतर या रस्त्यावर वाहतूक कोंडी सुरू होते. मुंबईच्या विविध भागातून पवई, सिप्झ, एमआयडीसी सारख्या भागात नोकरीसाठी येणारया मुंबईकरांच्या वाहनांची त्यात भर पडते आणि एकच कोलाहल होत जातो.

या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना कमीत कमी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागावा यासाठी वाहतूक पोलिस सतत नवनवीन प्रयोग करत असतात मात्र वाहतूक कोंडीची समस्या नियमित आहे. जेव्हीएलआरवर सुरु करण्यात आलेला नवीन प्रयोग कितपत यशस्वी होतो तो येणारा काळच ठरवेल.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!