पवईत कोविड-१९ शासकीय रूग्णालय बनवण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

प्रतिक कांबळे: कोरोना वायरस या महाभयंकर विषाणूने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. या सुक्ष्म विषाणूनी अनेकांना आपल्या जाळ्यात ओढले आहे. अनेकांचा मृत्यू झाला आहे. अजूनही या विषाणूवर औषध येणे बाकी असून, दिवसेंदिवस बाधितांची संख्या वाढत आहे. जगभरात हाहाकार माजवलेल्या या व्हायरसने पालिका भांडूप ‘एस’ विभागात येणाऱ्या पवई परिसरात देखील थैमान घातले आहे. यालाच पाहता पवईतील तरुण राहुल गच्चे यांनी मुख्यमंत्र्यांसह, आरोग्य मंत्री आणि भारत सरकार यांच्याकडे पवईमध्ये कोविड-१९ शासकीय रूग्णालय बनवण्याची मागणी केली आहे.

पवई मुंबईच्या त्या वस्त्यांपैकी एक आहे जिथे एका बाजूला इमारत आणि उच्चभ्रू वस्ती आहे, तर दुसऱ्या बाजूला चाळसदृश्य वसाहतीत राहणारे सर्वसामान्य पवईकर. कोरोना विषाणूची लागण होवून पवईतील या रोजंदारी आणि हातावर पोट असणाऱ्या कुटुंबातील अनेक व्यक्ती नकळतपणे याच्या विळख्यात आले आहेत. मात्र जवळपास शासकीय रूग्णालय उपलब्ध नसल्याने आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या या कुटुंबाला अवाढव्य बील आकारणाऱ्या खाजगी रूग्णालयात नाईलाजाने उपचारासाठी भरती व्हावे लागत आहे. या खाजगी रुग्णालयात सुद्धा त्यांना जागा उपलब्ध होईल का नाही याची खात्री नसते.

रोजगारावर आपले कुटुंब सांभाळणाऱ्या व्यक्ती गेली ४ महिने लॉकडाऊन कालावधीत हाताला रोजगार नसताना अगोदरच हतबल आहेत आणि त्यातच त्याच्या घरातील व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यास खाजगी रूग्णालयात उपचार करण्याइतपत रक्कम त्यांच्याजवळ असणे शक्यच नाही. यामुळे अनेकांना आपली जवळची माणसे सुद्धा गमवावी लागली आहेत.

या सर्व गोष्टींकडे पाहता पवईतील तरुण व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) विक्रोळी तालुका युवा कार्याध्यक्ष राहूल गच्चे यांनी या कोरोना वायरसच्या संसर्गामुळे आणखी माणसे गमवावी लागू नये म्हणून पवईत कोविड-१९ शासकीय रूग्णालय बनवण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे.

मुख्यमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्यासह महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य मुंबई सचिव, महानगरपालिका भांडूप ‘एस’ आरोग्य विभाग, स्थानिक नगरसेवक, आमदार, खासदार यांना पत्र पाठवत ही मागणी केली आहे.

पवई, विक्रोळी, भांडूप, कांजूरमार्ग या विभागातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत नागरिकांना शासकीय किंवा निम शासकीय रूग्णालय जवळपास कोठेही उपलब्ध नसल्याने पवई येथे कोविड-१९ शासकीय रूग्णालय उपलब्ध करून देण्याची मागणी याद्वारे करण्यात आली आहे.

या कोरोना विषाणूचा उपचार घेण्यासाठी पवईत शासकीय किंवा निम शासकीय रूग्णालय उपलब्ध नसल्याने आर्थिकदृष्ट्या कमवकुवत असलेले माझे सहकारी, मित्र मी या काळात गमावले आहेत. आणखी कोणाला गमावण्याची ताकद आता आमच्यात उरलेली नाही. या विषाणूनी बाधित होणाऱ्या व्यक्तीला त्वरित आणि जवळच्या शासकीय रूग्णालयात उपचार घेऊन जीवदान भेटावे म्हणून मी ही मागणी शासकीय दालनात केली आहे. – राहुल गच्चे

, , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!