गप्पाटप्पा आणि बरेच काही – अभिनेत्री आयेशा कडुस्कर

अभिनेत्री आयेशा कडुस्कर

अभिनेत्री आयेशा कडुस्कर

सुषमा चव्हाण: पवईला लाभलेला निसर्गाचा अनमोल खजिना मुंबईकरांसाठी नेहमीच आकर्षणाचा राहिला आहे. त्याबरोबरच पवई तलाव, आयआयटी कॅम्पस, हिरानंदानीसारखे उच्चभ्रू वसाहत ही पवईची ओळख बनलेली आहे. अशा या आपल्या पवईला अनेक दिग्गज मंडळी, उद्योजक, लेखक, कलाकार मंडळीचा वारसा लाभलेला आहे. त्यांच्यामुळे पवईच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. पवईच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी एक गोड अशी बालकलाकार ते बॉलीवूड अभिनेत्री म्हणून नावाजलेला चेहरा आपल्यासाठी घेवून आलोय गप्पा टप्पा आणि बरेच काहीमध्ये. ती अभिनेत्री आहे ‘यह उन दिनो कि बात हैं’ फेम आयेशा कडुस्कर.

आयेशा आपल्या लाडक्या कुत्र्यासोबत

आयेशा कडूस्करचा जन्म मुंबईत लोखंडवाला येथे झाला आणि मिठीबाई कॉलेज मुंबई येथून तिने आपले शिक्षण घेतले आहे. सायकोलॉजी विषयात विद्यापीठात टॉपर असणारी आणि अगदी वयाच्या सातव्या वर्षापासून अभिनयात पदार्पण करणाऱ्या आयेशामध्ये जन्मजातच अभिनेत्री आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. आज प्रत्येक तरुणतरुणीच्या मनात घर करून असणाऱ्या आयेशाची अभिनय कारकिर्दीची सुरुवात अगदी लहानपणीच झाली होती. आयेशा तिच्या आईसोबत लहानपणी त्यांच्या ब्युटीकमध्ये बसायची. जिथे अनेक दिग्गज मंडळींचे येणेजाणे होत असे. तिथे एका दिग्दर्शकाने तिला पाहिले आणि २००३’मध्ये ‘जिंदगी तेरी मेरी’च्या भूमिकेसाठी तिची निवड झाली. पुढे ‘जोर लगा के… हैय्या’सह अनेक मालिका, चित्रपट आणि बर्‍याच टीव्ही जाहिरातींमध्ये तिने काम केले आहे.

आयेशा एक प्रशिक्षित कथ्थक नर्तक, एक समर्पित अभिनेत्री आहे. सोनी टीव्हीच्या लोकप्रिय शो ‘ये उन दिनों की बात है’ मध्ये प्रीती अग्रवालच्या भूमिकेत ती दिसली आहे. अभिनेत्री प्रीतीच्या भूमिकेसाठी प्रेक्षक आणि समिक्षकांकडून तिचे खूप कौतुक केले गेले आहे.

‘ये उन दिनो कि बात है’मध्ये तिने साकारलेली प्रीतीअग्रवालची भूमिका

२०१२मध्ये बीबीसी लंडनने केलेल्या जगभरातील कलाकारांवरील डॉक्युमेंटरिजमध्ये भारतात त्यांनी ‘किड्स इन बॉलीवूड” थीमवर केलेल्या डॉक्युमेंटरिसाठी संपूर्ण भारतातून त्यांनी फक्त दोन मुलांची निवड केली होती. ज्यातील एक म्हणून आयेशाची निवड करण्यात आली होती.

 

तिचा हा संपूर्ण जीवन प्रवास तिने आवर्तन पवईशी बोलताना उलगडला.

तुझा अभिनय क्षेत्रातील प्रारंभिक प्रवास कसा होता?

पलक पे झलक मालिकेतील एक क्षण (अभिनेते नितेश पांडे आणि ख्याती केसवानी यांच्यासोबत.)

मी माझ्या अभिनयाच्या सुरुवातीच्या काळात पोगो अमेझिंग किड्स अवॉर्ड्स (पोगो चॅनल), प्रोमो फॉर डिस्ने चॅनेल, बूगी वूगी – विवा स्पेशल प्रोग्राम, बूगी वूगी – सेलिब्रिटी किड्स चॅम्पियनशिप, छोटे मियाँ, बूगी वूगी – किड्स चँपियनशिप २००८मध्ये सेलिब्रिटी अतिथी म्हणून काम केले होते.

जिंदगी तेरी मेरी कहानी (सहारा मनोरंजन); चाचा चौधरी (सहारा मनोरंजन); मजूबा का अजूबा (हंगामा टीव्ही); तलाश (डीडी १); रिहाई (सोनी टेलिव्हिजन); कान्हान हूं मैं (स्टार प्लस) सुनो हर दिल कुछ कहता है (सहारा १); जस्सी जैसी कोई नहीं (सोनी टेलिव्हिजन); पलक पे झलक  (डिजने), वीर शिवाजी (सोयराबाई भोसले), सुट लाइफ ऑफ करण अँड कबीर (डिजने), क्राईम पेट्रोल या सुरुवातीच्या काळात अभिनय केलेल्या काही मालिका आहेत.

मालिकांसोबतच तू टेलिफिल्म आणि चित्रपटांमध्ये सुद्धा दिसलीस त्याबद्दल थोडेसे.

मी काम केलेल्या काही टेलिफिल्म्स आणि चित्रपटांची नावे म्हणजे- टेलीफिल्म: भैरवी – झी टेलीफिल्म्स (फिल्म फेस्टमध्ये दाखविली आहे). वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट: जोर लगा के हैया – मिथुन चक्रवर्ती, रिया सेन, गुलशन ग्रोव्हर आणि महेश मांजरेकर यांच्यासह मिथुन फिल्म्स; व्हाइट एलिफंट – एक एनएफडीसी फिल्म (फिल्म फेस्टिव्हलसाठी) एजाज खान दिग्दर्शित. सैयां से सोलाह सिंगार – भोजपुरी फिल्म नगमा आणि रवी किशन यांच्यासोबत. अग्निपथ आणि दिल जंगली’ या बॉलीवूडमधील चित्रपटात मला आपली कला दाखवण्याची संधी मिळाली आहे.

तुझ्या चित्रपटात काम करण्याचा अनुभव कसा होता?

दिल जंगलीच्या कलाकारांसोबत

माझ्या हिट चित्रपटांपैकी एक म्हणजे अग्निपथ, ज्यात मी सुपरस्टार हृतिक रोशनसोबत अभिनय केला होता. चित्रपटात मी ह्रतिकच्या लहानपणीच्या मैत्रिणीची (बिंदिया) भूमिका साकारली आहे. नंतर मी जोर लगा के हैय्या (२००९), गोविंदुदु अंदरी वडेले (२०१४), द स्वीट लाइफ (२०१२), कॉट इन वेब (२०१४) असे अनेक चित्रपट केले आहेत. २०१८मध्ये ‘दिल जंगली’ या चित्रपटात तापसी पन्नू सोबत काम करण्याची संधी मला मिळाली. प्रत्येक चित्रपटातील सर्वच कलाकार दिग्गज होते त्यांच्यासोबत काम करताना मला खूप काही शिकायला तर मिळालेच पण खूप सारे प्रेम आणि मार्गदर्शन सुद्धा मिळाले.

तू इतर भाषिक चित्रपटात सुद्धा काम केले आहेस त्याबद्दल थोडे सांग

हो बॉलिवूड चित्रपटांव्यतिरिक्त मी भोजपुरी आणि दक्षिण भारतीय चित्रपटही काम केले आहे. तेलगू सिनेमात राम चरन सोबत काम केले आहे. या चित्रपटात मी राम चरणच्या बहिणीची भूमिका साकारली आहे.

तुझा शैक्षणिक प्रवास कसा होता?

बॉम्बे स्कॉटिश आणि हिरानंदानी फाउंडेशन स्कूलमध्ये मी प्राथमिक शिक्षण घेतले. शालेय जीवनात अभिनयात चमक दाखवण्यासोबतच मी शाळेत सुद्धा नेहमीच चांगली विद्यार्थीनी होती. माझे शिक्षक मला नेहमीच मला वर्गाच्या एक हुशार विद्यार्थ्यांपैकी एक असल्याचे म्हणत. मी मिठीबाई कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले.

शाळेत, मी नाटक आणि इतर विविध सह-अभ्यासक्रमात भाग घ्यायचे. सहभाग घेतल्यानंतर माझे शिक्षकांकडून खूप कौतुक व्हायचे, ज्यामुळे अभिनय क्षेत्रात मला अधिक रस निर्माण झाला.

अभिनयासोबतच तुझ्या आवडीनिवडी काय आहेत?

मला वाचनाची खूप मोठी आवड आहे. जेव्हा जेव्हा मला अभिनयातून ब्रेक मिळतो तेव्हा मी आपल्या आवडीच्या पुस्तकात रमलेली असते. वाचनासोबतच मला नवनवीन भाषा शिकण्यास आवडतात. इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषा चांगल्या बोलता येतात. माझ्या छंदांमध्ये नृत्य, गाणे, गिटार आणि चित्रकला यांचाही समावेश आहे.

क्लासिकल सिंगिंग गुरू कृष्णा काळे, मनोहर रे आणि कथक नृत्य गुरु हितेश कृष्णा यांच्यासारख्या गुरूंना मी कधीच विसरणार नाही, ज्यांनी मला कला सादर करण्याच्या मूलभूत गोष्टींमध्ये आधार दिला.

तुला सामाजिक विषय हाताळणे आणि त्यासाठी काम करणे आवडते त्याबद्दल काय सांगशील?

‘चाईल्ड एब्युज’ या विषयावर बनवलेल्या ‘आवृत्ती’ या लघुपटात तिने साकारलेली भूमिका

हो मला सामजिक कार्यात खरच खूप मोठा रस आहे. बालपणापासून पर्यावरण रक्षणासाठी मी काम करत आलेय. मला प्राणी खूप आवडतात आणि त्यांच्यासाठी काम करणे सुद्धा. पुढील काळात अनेक विषयांवर मी काम केले त्यातील ‘चाईल्ड एब्युज’ या विषयावर बनवलेल्या ‘आवृत्ती’ या लघुपटात मी मुख्य भूमिका साकारली होती. या लघुपटाला मॅनहॅटन फिल्म फेस्टिवलमध्ये प्रथम पारितोषिक मिळाले आहे. अनेक संस्थांच्या डोनेशन ड्राईव्हसाठी मी आपले योगदान देत असते.

आपल्या चाहत्यांच्या सोबत तू कशी संपर्कात असतेस?

माझ्या इन्स्टाग्रामवर २,१२,०००+ फॅन फॉलोअर्स आहेत. मी बर्‍याचदा तिथे माझे मित्रांचे आणि कुटुंबियांचे फोटो पोस्ट करते. इथे माझ्या चाहत्यांशी मनमोकळ्या गप्पा मारते. फेसबुकवर माझे अंदाजे २३०००+ फॉलोअर्स इथेही मी व्यक्त होत असते.

इंस्टाग्रामhttps://www.instagram.com/ayeshak_/

फेसबुकhttps://www.facebook.com/ayeshakaduskarr/

तुझ्या कुटुंबाबद्दल थोडेसे

वीर शिवाजीच्या सेटवर आई लिना कडुस्कर आणि सहकलाकारांसोबत. या मालिकेत तिने सोयराबाईची भूमिका साकारली होती.

माझ्या कुटुंबात मी, माझी आई आणि माझा मोठा भाऊ आहे. एका अपघातात वडील मागच्यावर्षी आम्हाला सोडून गेले. माझा भाऊ रुबेन कडूस्कर स्टँडअप कॉमेडियन आहे तर आई फॅशन डिझायनर आहे.

या लॉकडाऊनमध्ये तू आपला वेळ कसा व्यतीत करतेयस?

मला या लॉकडाऊनमध्ये आपल्या परिवारासोबत आणि स्वतःसाठी खूप वेळ मिळतोय त्यामुळे याचा पुरेपूर फायदा घेतेय. मोठा भाऊ आणि आई सोबत चर्चा, अनुभवाची देवाणघेवाण होतेय. पुस्तके वाचतेय, गिटार वाजवतेय. चाहत्यांशी गप्पा मारतेय.

अभिनय क्षेत्रात पुढील प्रवास कसा असणार आहे?

मला लोकांना आवडणारे असे चांगले काम करायला आवडते आणि आवडेल. येणाऱ्या काळात वेब सिरीजसाठी काम करण्याची इच्छा आणि प्रयत्न आहेत.

अनेक जाहिराती, मालिका आणि चित्रपटांमधून तरुणाईच्या हृदयावर राज करणाऱ्या आणि नाव कमावलेल्या आयेशाचे जीवन अजूनही तेवढेच साधे आणि सरळ आहे. आजही सामन्यात सामान्यपणे वावरणाऱ्या आयेशाचा पवईकरांना नेहमीच अभिमान असणार आहे.

आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा

 

 

आवर्तन पवईचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूबवर फॉलो करू शकता.

, , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!