मुंबई पोलिस दलातील उत्कृष्ट सेवेसाठी पोलीस निरीक्षक सुप्रिया पाटील यांना ‘आयएमसी पुरस्कार’

मुंबई पोलीस दलात प्रशाकीय कामात केलेल्या उत्कृष्ट सेवेसाठी पवई पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुप्रिया पाटील यांचा मुंबई पोलीस कर्मचाऱ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या मानाच्या ‘आयएमसी पुरस्काराने’ सन्मान करण्यात आला आहे. मुंबई पोलीस कर्मचार्‍यांना उत्कृष्ट सार्वजनिक सेवा २०१९-२०२२साठी आयएमसी शताब्दी ट्रस्टने चर्चगेट, येथील मुख्यालयात या पुरस्कारांचे आयोजन केले होते.

मुंबई पोलीस दलातील ३ पोलीस महिलांसह १० पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या निस्वार्थी आणि धाडसी कृत्यांसाठी पोलीस आयुक्त, मुंबई विवेक फणसळकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्कार विजेत्यांना त्यांच्या मेहनतीची ओळख म्हणून ट्रॉफी, प्रशस्तीपत्र आणि प्रत्येकी १ लाख रुपयांचा धनादेश देवून गौरवण्यात आले.

पुरस्कार सोहळ्यास श्री राम गांधी (गव्हर्नर आयएमसी), श्री. अनंत सिंघानिया (अध्यक्ष आयएमसी), श्री. समीर सोमय्या (उपाध्यक्ष आयएमसी), श्री. संजय मेहता (उपमहासंचालक आयएमसी), सुश्री शीतल काल्रो (उपसंचालक आयएमसी), यांच्यासह चेंबरचे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

२०१६ सालाचे तत्कालीन पोलीस आयुक्त श्री. दत्तात्रय डी. पडसलगीकर यांच्याशी सल्लामसलत करून २०१६मध्ये या पुरस्काराची सुरुवात झाली. गुन्ह्यांचा सर्वोत्कृष्ट तपास, महिला आणि अल्पवयीन पीडितांचे संरक्षण, प्रणाली सुधारण्यासाठी नाविन्यपूर्ण कार्य, गुन्ह्यातील सर्वोत्कृष्ट शिक्षा, गुन्ह्यातील सर्वोत्कृष्ट मालमत्तेची पुनर्प्राप्ती, अंमली पदार्थांच्या प्रतिबंधासाठी केलेले उत्कृष्ट कार्य, गुंतागुंतीच्या सायबर गुन्ह्यांवर सर्वोत्तम तपास आणि वाहतूक विभागाने केलेले उत्कृष्ट कार्य या विभागांतर्गत यावेळी पुरस्कार प्रदान करण्यात आले.

पवई पोलीस ठाण्यात नियुक्त सुप्रिया पाटील यांनी मुंबई पोलीस दलातील आपल्या सेवेत प्रशाकीय व्यवस्था आणि कर्मचारी यांच्यासाठी विविध उपाययोजना राबवत मोलाचे योगदान दिले आहे. कोविड काळात योधांच्या मुख्य फळीत असणाऱ्या पोलीस दलातील कर्मचारयांच्या स्वास्थ्यासाठी मेहनत घेतली आहे. पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यांसाठी घर आणि कर्तव्य सांभाळताना आनंदाचे क्षण मिळावेत म्हणून विविध माध्यमातून त्या काम करत आहेत. त्यांच्या अशाच अनेक कार्यासाठी त्यांना ‘आयएमसी पुरस्कार’ देवून सन्मानित करण्यात आले आहे.

यावेळी बोलताना पोलीस आयुक्त, मुंबई म्हणाले, “मुंबई पोलीस कर्मचार्‍यांचे प्रयत्न आणि परिश्रम ओळखण्यासाठी हा पुरस्कार सोहळा आयोजित केल्याबद्दल मी आयएमसीचे आभार मानू इच्छितो. या पुरस्काराचे दहा श्रेणींमध्ये वर्गीकरण करण्यात आले होते आणि निवड समितीने पुरस्कारांसाठी सर्वोत्कृष्ट प्रकरणांची निवड करण्यासाठी मोठ्या काळजीने प्रवेशिकांची छाननी केली आहे. समाजाकडून प्रोत्साहन देणारा हा पुरस्कार प्रदान केल्याबद्दल आयएमसी शताब्दी ट्रस्टशी संबंधित असल्याचा आम्हाला अभिमान आहे.”

तर आयएमसी अध्यक्ष श्री अनंत सिंघानिया म्हणाले, “पुरस्कारांसाठी दर्जेदार नामांकन प्राप्त झाले होते आणि प्रत्येक सबमिशनने सेवा, धाडस आणि कर्तव्याची आकर्षक कथा सांगितली होती. वास्तविक जीवनातील नायकांच्या शौर्य कृत्यांना ओळखण्यासाठी आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी म्हणून हा पुरस्कार आहे.”

पाटील यांच्यासोबतच खालील पोलीस कर्मचारी आणि पोलीस महिलांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

१) सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कै. श्री. अरविंद जनार्दन खोत – कर्तव्य बजावताना सर्वोच्च त्याग

२) पोलीस कॉन्स्टेबल, श्री विक्रम जयसिंग देसाई – कर्तव्यावर असताना किंवा अन्यथा कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मानवी जीवन आणि मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी सर्वात धाडसी कृत्य

३) महिला पोलीस निरीक्षक, श्रीमती. मनीषा अजित शिर्के – महिला आणि अल्पवयीन पीडितांना दिलेली मदत आणि या संदर्भात केलेला सर्वोत्तम तपास

४) महिला पोलीस निरीक्षक, श्रीमती. सुप्रिया पाटील – वितरण प्रणाली सुधारण्यासाठी किंवा उत्तम मातृभूमी सुरक्षिततेसाठी नाविन्यपूर्ण कार्य

५) पोलीस निरीक्षक श्री शशिकांत बाबी पाडावे – गुन्ह्यांचा सर्वोत्तम तपास

६) सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री अशोक ढमाले – गुन्ह्याची सर्वोत्तम शिक्षा

७) पोलीस निरीक्षक, श्री सदानंद येरेकर – गुन्ह्यातील मालमत्तेची सर्वोत्तम पुनर्प्राप्ती

८) सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री अमोल कदम – NDPS कायद्यांतर्गत अंमली पदार्थांच्या धोक्याला आळा घालण्यासाठी केलेले उत्कृष्ट कार्य

९) महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक, श्रीमती. सविता भीमराव कदम – जटिल सायबर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी सर्वोत्तम तपास

१०) पोलीस नाईक, श्री चित्रांगढ मारुती बाणा – वाहतूक विभागात केलेले उत्कृष्ट काम

, , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!