सेन्ट्रल अव्हेन्यू रोडवर इडन, सायप्रेस परिसरात पवई वाहतूक विभागाच्या कारवाईला सुरुवात

पवईतील हिरानंदानी गार्डन येथील ब्लू बेल ते सायप्रस बिल्डिंगपर्यंत परिसरात सम-विषम पार्किंग लागू करण्यात आली आहे. या परिसरातील पार्किंगच्या सूचना देणारे फलक परिसरात काही दिवसांपूर्वीच लावण्यात आले होते. आता या परिसरात पवई वाहतूक विभागाने पोलीस कर्मचारी नियुक्त करत नियम मोडणाऱ्या वाहनचालकाविरुद्ध कारवाई सुरु केली आहे. नागरिकांनी पार्किंग आणि नो एन्ट्रीच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन वाहतूक विभागातर्फे करण्यात आले आहे.

सुटसुटीत आणि प्रशस्त रस्ते म्हणून ओळख असणाऱ्या हिरानंदानी गार्डन्स परिसरात रुंद रस्ते आणि पुरेशा पार्किंगसह सुनियोजन करण्यात आले आहे. तथापि, सेंट्रल एव्हेन्यू रोडवरील डॅफोडिल, सायप्रेस आणि ईडन इमारतींमध्ये खरेदी करण्यासाठी येणारे ग्राहक, दुकान मालक आणि रहिवाशी यांच्या गाड्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला डबल आणि ट्रिपल पार्क केल्या जात असल्याने परिणामी परिसरात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असते.

यासंदर्भात हिरानंदानी गार्डन परिसारातील रहिवाशी, रहिवाशी संघटना वाहतूक विभाग, पोलीस आणि पालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर वाहतूक विभागाने या भागात होणारी वाहतूक कोंडी पाहता एकेरी मार्गाची यंत्रणा कार्यान्वित केली आहे. मात्र, नागरिक वाहतुकीचे नियम मोडून वन-वेमध्ये प्रवेश करत असल्याने तसेच दुहेरी-तिहेरी पार्किंगमुळे वाहतुकीची समस्या वाढली आहे. याबाबत १३ डिसेंबर रोजी ‘हिरानंदानी गार्डन्स पवई रहिवासी संघटने’च्या सदस्यांनी वाहतूक समस्या मांडण्यासाठी तत्कालीन सहपोलीस आयुक्त (वाहतूक) राजवर्धन सिन्हा आणि पोलीस उपायुक्त (वाहतूक पूर्व) राजू भुजबळ यांची भेट घेत समस्या मांडली होती.

“वरिष्ठांकडून मिळालेल्या आदेशानुसार, पोलीस उपायुक्त वाहतूक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवई वाहतूक विभाग आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या परिसराची पाहणी केली आणि रहदारीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर काही उपाययोजना सुचवल्या,” असे पवई वाहतूक विभागाने सांगितले.

२६ फेब्रुवारीला इडन (१, २, ३, ४), सायप्रेस, डॅफोडिल, ट्युलिप आणि ब्लू बेल इमारतींमधील पदाधिकाऱ्यांची परिसरातील नागरी समस्यांसह वाहतूक समस्यांवर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. यावेळी झालेल्या चर्चेनंतर २७ फेब्रुवारी रोजी मालबिन व्हिक्टर, विकास अरोरा, डॉ. रमेश अय्यंगार आणि प्रमोद चव्हाण यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवई वाहतूक उत्तम सूर्यवंशी यांच्यासह परिसराची पाहणी करत परिसरात वाहतूक पोलिसांची उपस्थिती; एकतर्फी नियमाची कठोर अंमलबजावणी; मार्केट रोडवरील पार्किंगची जागा चिन्हांकित करणे; पार्किंग चिन्हे स्थापित करणे; दुहेरी पार्किंगवर बंदी; सीसीटीव्ही चालानची अंमलबजावणी; रिक्षा स्टँडचे स्थलांतर; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आणि या रस्त्यावर भरधाव धावणाऱ्या वाहनावर कारवाई करण्याची मागणी केली होती.

या भागातील पार्किंगची समस्या समजून घेतली असता परिसरात सम-विषम पार्किंग केल्यास रस्ता वाहतुकीसाठी मोकळा होऊन वाहतूक कोंडीची समस्या निश्चित सुटेल हे लक्षात आले. नॉर्थ बाऊंडवर सम दिवस आणि विषम तारखांना दक्षिण बाउंडवर पार्किंग उपलब्ध करण्यात येईल,” असे सूर्यवंशी यांनी सांगितले.

पाठीमागील महिन्यात या संपूर्ण पट्ट्यात पार्किंग व्यवस्था पट्टे मारणे आणि सम-विषम, एकतर्फी मार्गाचे फलक लावल्यानंतर पोलिसांनी सुरुवातीचे काही दिवस नागरिकांना वाहने नियमाने पार्क करण्याच्या सूचना दिल्यानंतर आता नियम मोडणाऱ्या वाहन आणि वाहन चालकावर कारवाईला सुरुवात केली आहे.

यासंदर्भात पुष्टी करताना सूर्यवंशी म्हणाले, “नागरिक आणि वाहतूक पोलीस आम्ही एक टीम म्हणून एकत्र काम करत आहोत. माझ्या टीममधील पोलीस उपनिरीक्षक जाधव आणि इतर चार जण दररोज या परिसरात चुकीच्या बाजूने प्रवेश करणाऱ्या आणि वाहने पार्क करणाऱ्या वाहनांवर नियमितपणे कारवाई करत आहेत. आम्ही क्षेत्र चिन्हांकित केले आहे. ईडन येथील सीसीटीव्ही कॅमेरेही कार्यरत झाले असून, ऑनलाईन चालन करण्यास देखील सुरुवात झाली आहे.”

, , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!