शाब्बास पवई पोलीस; सायबर चोरट्याने उडवलेले २ लाख मिळवले परत

सध्याच्या काळात सायबर चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून, दररोज कोणी-ना-कोणी त्यांच्या फसवणुकीला बळी पडत आहे. जगाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात बसून तांत्रिक मदतीने गुन्हे करत असल्याने त्यांना पकडणे म्हणजे एक दिव्यच असते. मात्र भल्या भल्या गुन्हेगारांना पोलिसी खाक्या दाखवत वठणीवर आणणाऱ्या मुंबई पोलिसांनी या सायबर चोरट्यांना सुद्धा वठणीवर आणण्यास सुरुवात केली आहे. पवई पोलिसांनी अशाच प्रकारे सायबर फसवणुकीतून चोरट्याने लांबवलेले २ लाख परत मिळवत चोरट्याला चांगलाच धडा शिकवला आहे. सायबर चोरट्याचे बँक खाते गोठवले असून महाराष्ट्रासह, दिल्ली आणि गुजरात येथील गुन्ह्यातून लांबवलेली रक्कम त्यात बंद केली आहे. एवढ्यावरच न थांबता पवई पोलीस आता त्याच्या मुसक्या आवळण्याच्या तयारीत आहेत.

हिरानंदानी रुग्णालयजवळील ब्लुमिंग हाईट इमारतीत राहणारे ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक यांनी आपल्या पत्नीसोबत वाराणसी येथे जाण्यासाठी विमानाची तिकिटे काढली होती. मात्र वाढत्या कोरोनाच्या प्रसारामुळे हे नियोजन पुढे ढकलण्यासाठी त्यांनी १ फेब्रुवारीला विमान कंपनीच्या नावाने असणाऱ्या एका वेबसाईटला भेट देत तिथे दिलेल्या टोलफ्री नंबरवर संपर्क साधला. टेलीकॉलरने प्रवासाच्या तिकीटाच्या बदलाबद्दल आमच्या संबंधित एक्झिक्युटिवचा तुम्हाला फोन येईल असे त्यांना सांगितले. काही वेळातच त्यांना फोन करून फोन करणाऱ्या व्यक्तीने एनी डेस्क नामक एप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगत आलेला ४ डीजीट कोड मागितला. सोबतच त्यांच्या एसबीआय बँकखात्याचा टी पिनकोड सुद्धा जाणून घेतला.

काही वेळातच ज्येष्ठ नागरिकाला त्यांच्या खात्यातून विविध ८ व्यवहाराच्या माध्यमातून एकूण ३ लाख ४५ हजार रुपये हस्तांतरण झाल्याचे समोर आले. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच त्यांनी पवई पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती.

“आम्ही फसवणूक आणि बनावट ओळख निर्माण करणे बाबत गुन्हा नोंद करून तक्रारदार यांच्या खात्यातून कोणत्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे याबाबत माहिती मागवली होती,” असे याबाबत बोलताना पवई पोलिसांनी सांगितले.

“वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबुराव सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक मदतीच्या आधारावर फिर्यादी यांची फसवणूक करून हस्तांतरीत केलेल्या रक्कमेपैकी २ लाखाची रक्कम मिळवत तक्रारदार यांना परत केली आहे. तसेच तक्रारदार यांच्या खात्यातून ज्या खात्यात रक्कम जमा झाली होती ते खाते गोठवले आहे,” असे याबाबत बोलताना सायबर गुन्हे तपासी अधिकारी विशाल कोरडे यांनी सांगितले.

या सायबर चोरट्याने पवई मुंबईसह दिल्ली आणि गुजरात येथील नागरिकांची सुद्धा फसवणूक केली असून, गोठवलेल्या खात्यांमध्ये त्याची रक्कम जमा आहे. तांत्रिक माहितीच्या आधारावर सायबर चोरट्याची ओळख पटली आहे आणि लवकरच त्याच्या मुसक्या आवळल्या जातील असे यासंदर्भात बोलताना पोलिसांनी सांगितले.

मुंबई पोलीस आता सायबर गुन्हे उघड करण्यास सक्षम झाली असली आणि सायबर चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या जात असल्या तरीही नागरिकांनी ऑनलाईन आर्थिक व्यवहार करताना आणि अनोळखी व्यक्तीसोबत आपली खाजगी माहिती सामाईक करू नये असे आवाहन मुंबई पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

, , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!