चांगला, टापटिपीत पेहराव करून, मोठ्या घरातील इसम असल्याचे भासवत मोठ्या इमारतींमध्ये प्रवेश करून घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने मुसक्या आवळल्या आहेत. रवींद्र सुरावत (२१) असे अटक आरोपीचे नाव आहे.
उमा मल्होत्रा मरोळ येथील अशोक टॉवरच्या पाचव्या मजल्यावरील घरात आपल्या परिवारासोबत राहतात. २ जानेवारीला काही कामानिमित्त त्या घराबाहेर गेल्या होत्या. परत आल्यावर पाहतात तर काय, घरातील सामान विखरलेले होते आणि कपाटातील चोवीस हजाराची रक्कम आणि सॅमसंग कंपनीचा एक मोबाईल गायब होता. याबाबत उमा यांनी पवई पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंद केला होता.
सोसायटीत असणाऱ्या सिसिटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज ताब्यात घेवून तपासले असता एका तरुणाची संशयास्पद हालचाल आढळून आली. सोसायटीत त्या इसमाचा फोटो दाखवून चौकशी केली असता सोसायटीत राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीशी त्याचा काहीच संबंध आढळून आला नाही. ज्यानंतर त्याचा फोटो खबरी आणि मुंबईच्या विविध पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना दाखवण्यात आला असता त्याच्यावर कांदिवली पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद असल्याची माहिती पवई पोलिसांना मिळाली.
“खबरींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर आम्ही त्याला वरळी येथून अटक केली आहे. त्याच्यावर कांदिवली येथे पाच तर वरळी येथे अशाच प्रकारच्या गुन्ह्याची नोंद आहे.” असे आवर्तन पवईशी बोलताना तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक समीर मुजावर यांनी सांगितले.
यासंदर्भात बोलताना पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाई म्हाडेश्वर म्हणाले, “चांगला, टापटिपीत पेहराव केलेला सुरावत गुन्हेगारी कारवाई आपल्या पेहरावाच्या आडाने करत असल्यामुळे, सुरक्षारक्षक किंवा इतर लोकांना त्याच्यावर कधीच संशय येत नसे.”
पवई पोलिसांनी सुरावत याला भादवि कलम ४५४, ३८० नुसार अटक करून कोर्टात हजर केले असता अधिक चौकशीसाठी पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा
Hats off Powai police…