पवईची वाढती लोकप्रियता आणि पर्यटन स्थळ म्हणून मुंबईकरांचा ओढा पाहता मरीन ड्राईव्ह येथील क्वीन नेक्लेसच्या धर्तीवर करोडो रुपये खर्च करून पवई तलाव परिसरात सुशोभिकरण करण्यात आले आहे, परंतु जवळपास एक महिन्यापासून या सुशोभिकरण करण्यात आलेल्या परिसरात बनवलेल्या पदपथावरील दिवेच बंद पडलेले आहेत. त्यामुळे पवईच्या राणीचा नेकलेस चोरीला गेली कि काय असा प्रश्न आता मुंबईकरांना पडलेला आहे. याबाबत जल अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता याबद्दल काहीच माहिती नाही आहे आम्ही बघून तुम्हाला कळवतो असे उत्तर देण्यात आले.
आयआयटी, हिरानंदानी, सागरी प्रशिक्षण संस्था, पवई तलाव अशा अनेक गोष्टींमुळे पवईला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले होते. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडच्या निर्मितीमुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या दुव्यावर असणाऱ्या पवई तलावाच्या भागात सहलीचे ठिकाण म्हणून आकर्षित होणाऱ्या मुंबईकरांसाठी आणि पवई तलाव भागातला कचरा हटवण्यासाठी पवई तलाव सुशोभिकरणाचा प्रकल्प आखण्यात आला.
करोडो रुपये खर्च करून मरीन ड्राईव्ह येथील क्वीन नेक्लेसच्या धर्तीवर मुंबईकरांना आणखी एक हक्काचे प्रेक्षणीय स्थळ बनवण्याचे काम सुरु झाले. गणेश विसर्जनच्या काळात येणाऱ्या अडचणी आणि धोका लक्षात घेता २ गणेशघाट, पदपथ, मुलांना खेळण्यासाठी जागा, निसर्ग उद्यान, पक्षी निरीक्षणाची ठिकाणे, मनोरंजन थेटर अशा अनेक सोई सुविधा देण्यात आल्या पण या सुशोभिकरणाचे मुख्य आकर्षण बनले ते क्वीन नेकलेसच्या धर्तीवरच बनवलेली येथील दिव्यांची मांडणी आणि रोषणाई. पण गेल्या ३ आठवड्यापेक्षा जास्त दिवसांपासून येथील बत्ती गुल असून संपूर्ण पवई तलाव परिसरात काळोखाचे साम्राज्य पसरलेले आहे.
तलाव भागात चणे शेंगदाणे विकणाऱ्या एक फेरीवाल्याने याबाबत बोलताना सांगितले “साहब मै आखरी महिने मे गाव गया था और १५ दिन पहले हि लौटा हू तब सें देख रहा हू यहां कि पुरी बत्तीया गायब है.”
स्थानिक जेष्ठ नागरिक अप्पुकटटन यांनी सांगितले “आमचा ३५-४० लोकांचा जेष्ठ नागरिकांचा चमू रोज सकाळी ६.३० वाजता ताजी हवा खायला आणि फिरायला तलाव किनाऱ्याला जात असतो. पूर्वी कधी कधी दिवे लागलेले दिसायचे पण गेले काही दिवस पूर्ण गायब आहेत. आम्ही या बाबत लवकरच तक्रार नोंदवणार आहोत.
या प्रकाश व्यवस्थेच्या गायब होण्याने पोलीस खात्याचे काम सुद्धा वाढल्याचे काही अधिकाऱ्यानी सांगितले. त्यांच्या मते दररोज हजारोच्या संख्येने जोडपी या भागात फिरायला येतात. गैरवर्तन होऊ नये, त्यांच्या सुरक्षेसाठी वेळोवेळी आम्ही संपूर्ण परिसरात गस्त घालत असतो परंतु प्रकाश व्यवस्था बंद होण्याने आम्हाला मोबाईलचा किंवा दुसरी काहीतरी प्रकाश व्यवस्था करून गस्त घालावी लागते पण त्याच्या सहाय्याने दूरवर काय चाललेय हे दिसत नाही, त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तींच्या व्यक्तींसाठी ते फायद्याचे ठरतेय.
जल अभियंते आणि कार्यकारी अभियंते यांना जेव्हा आमच्या प्रतिनिधींनी विचारपूस केली, तेव्हा त्यांना कोणतीच कल्पना नसून, ते फक्त एकदुसऱ्याकडे बोट दाखवण्या व्यतिरिक्त दुसरे कोणतेही काम करत नव्हते. घाटकोपर कार्यालयात जल अभियंत्यांनी कार्यकारी अभियंते विभूते यांच्याकडे बोट केले तर विभूते यांनी दुसरे कार्यकारी अभियंते रसाळ यांच्याकडे. शेवटी रसाळ यांनी “मला सुद्धा काही माहिती नाही, मी माहिती घेवून तुम्हाला कळवतो” असे आमच्या प्रतिनिधीला सांगितले”.
याबाबत प्रशासनातील एका व्यक्तीने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले “परिसरात वीजपुरवठा करणारी एक केबल खराब झाली असून तिचे काम कोण करणार या वरून रिलाईन्स आणि पालिका प्रशासन यात वाद चालू असल्याने तिथली प्रकाश व्यवस्था खंडित आहे आणि जो पर्यंत तिथला वाद मिटत नाही तो पर्यंत वीजपुरवठा होण्याची शक्यताही नाही.
No comments yet.