संघर्षनगरमध्ये उभे राहिले भव्य खेळाचे मैदान, उद्यान; आमदार लांडे यांच्या हस्ते पर्यावरण दिनी लोकार्पण

संघर्षनगरला सुंदरनगर बनवण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतलेले चांदिवलीचे स्थानिक आमदार दिलीप मामा लांडे यांच्या प्रयत्नातून परिसराला अजून एक देणगी लाभली आहे. संघर्षनगर येथील न.भू. क्र. ११/३ वर बृहनमुंबई महानगर पालिकेचे भव्य असे बहुउद्देशीय खेळाचे मैदान आणि उद्यान उभे राहिले आहे. ५ जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत आमदार दिलीप मामा लांडे यांच्या हस्ते या मैदानाचा उद्घाटन सोहळा पार पडला असून, जनतेसाठी खुले करण्यात आले आहे. यावेळी परिसरात नागरिकांकडून वृक्षारोपण देखील करण्यात आले.

चांदिवली, संघर्षनगरमध्ये पवार पब्लिक स्कूलच्या बाजूला उभारण्यात आलेल्या या भव्य अशा मैदानाच्या शुभारंभा प्रसंगी आमदार दिलीप मामा लांडे यांच्यासह बृहन्मुंबई महानगर पालिका उपआयुक्त श्री शिरसागर, सहाय्यक आयुक्त (एल वार्ड) श्री हेर्लेकर, साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिंदे, पालिका उद्यान विभगाचे अधिकारी श्री. चौगुले तसेच पालिकेचे अधिकारी, प्रभाग क्रमांक १५७ पदाधिकारी, शिवसैनिक आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत हजारो कुटुंबाना चांदिवली येथील संघर्षनगर भागात वसवण्यात आले आहे. मात्र आज एवढ्या वर्षानंतर देखील येथील नागरिक खेळाचे मैदान, उद्यान अशा सुविधांपासून वंचित आहेत. “चांदिवली विधानसभेच्या परिसरातील सर्वात जास्त लोकसंख्या असणाऱ्या या परिसरात मुलांना खेळण्यासाठी मैदान आणि ज्येष्ठ नागरिक, मोर्निंग वॉकर्ससाठी उद्यान सारख्या सुविधा परिसरात निर्माण करण्याची मागणी सतत येथील नागरिकांकडून होत होती. त्या अनुषंगाने प्रयत्न करून पालिकेचे भव्य असे मैदान आणि उद्यान उभे करून नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे,” असे यासंदर्भात बोलताना आमदार लांडे यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, “आम्ही एवढ्यावरच थांबणारे नाही, या परिसरातील लोकसंख्या पाहता नागरिकांच्या मागणीच्या आणखी काही सुविधा देखील लवकरात लवकर या परिसरात दिल्या जाणार आहेत.”

यावेळी आमदार लांडे, पालिका अधिकारी आणि नागरिकांनी परिसरात वृक्षारोपण देखील केले.

, , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!