नवीन पूल बांधताना त्याचे रुंदीकरण करत पुलाची लांबी ३३.६ मीटर तर रुंदी ९.३ मीटर करण्यात येणार आहे.
पवईत मोरारजी नगर परिसरात मिठी नदीवर असलेला जुना पूल पाडून आता नवीन पूल बांधण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. आधीच्या पुलाची दुरावस्था झाल्याने नवीन पूल बांधला जाणार आहे. यासाठी निविदेद्वारे एका कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. या नवीन पुलाच्या बांधणीसाठी ९ कोटी ७२ लाख रुपये खर्च येणार आहे.
एकेकाळी स्वच्छ, निर्मळ नदी म्हणून ओळख असणाऱ्या मिठी नदीचा घाण टाकल्याने आणि अतिक्रमणामुळे हळूहळू नाला झाला आहे. याला पूर्ववत करत पुन्हा वैभव प्राप्त करून देण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. यासाठी पालिकेतर्फे विविध उपक्रम राबवले जात आहेत. तसेच या नदीच्या मार्गातील परिसर सुंदर बनवण्याचे काम देखील पालिकेतर्फे सुरु आहे.
पवईतील मोरारजी नगर येथे मिठी नदीवरील जुन्या पुलाची स्थिती जाणून घेण्यासाठी पालिकेतर्फे सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली होती. अहवालात जुन्या पुलाची दुरावस्था झाल्याचे नमूद असून, या पुलावरून सध्या रहदारी सुरू आहे.
नवीन पूल उभारणीसाठी पालिकेने मागवलेल्या निविदांमध्ये दोन कंपन्यांनी रुची दाखवत निविदा भरली होती. यातील एका कंपनीची निवड करून पूल उभारणीचे काम सोपवण्यात आले आहे. पूल उभारणीसाठी ९ कोटी ७२ लाख ६२ हजार रुपये खर्च येणार आहे.
पवईला आरेशी जोडणाऱ्या या मार्गात भविष्यात कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी पालिकेने हा पूल दोन टप्प्यांत पाडून नवीन पूल बांधण्याचे ठरवले आहे. नवीन पूल बांधताना त्याचे रुंदीकरण करत पुलाची लांबी ३३.६ मीटर तर रुंदी ९.३ मीटर करण्यात येणार आहे. तसेच पालिकेच्या ‘पेडस्ट्रीअन फस्ट’ योजनेनुसार या पुलावर १.२२ मीटरचे पदपथ आणि ०.३ मीटर उंचीची भिंत बांधण्यात येणार आहे. पाण्याचा प्रवाह वाहून जाण्यासाठी दोन मीटरचे अतिरिक्त काँक्रिट कल्व्हर्टचेही बांधकाम देखील केले जाणार आहे.
तुमचे मत पुढे दिलेल्या फॉर्ममध्ये नोंदवा
No comments yet.