भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर भागात असलेले निवासस्थान राजगृहावर मंगळवारी दोन अज्ञात इसमांनी हल्ला करत तोडफोड केली. यानंतर त्यांच्या अनुयायांकडून मोठा राग व्यक्त केला जात आहे. मात्र आंबेडकर परिवाराने अनुयायांना शांत राहण्याची विनंती केल्यानंतर पवई परिसरातील अनुयायांतर्फे आरोपींना त्वरित अटक करून, आरोपींवर कठोर कारवाई करावी आणि राजगृह तसेच आंबेडकर परिवाराला सक्षम सुरक्षा प्रदान करण्याची मागणी करणारे निवेदन पत्र पवई पोलीस ठाण्यात देण्यात आली.
पवईतील वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया आणि बहुजन समाज पार्टीच्यावतीने पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दळवी यांना पत्र देवून ही मागणी करण्यात आली.
काय घडलेय
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर मंगळवार, ७ जुलै रोजी संध्याकाळी दोन अज्ञात इसमांनी तोडफोड केली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड करत घराच्या काचांवरही दगडफेक करत परिसरातील कुंड्यांचेही नुकसान केले.
मुंबई पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत सीसीटीव्ही फुटेज मिळवत तपास सुरु केला आहे.
या संदर्भात माहिती पडताच संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. मोठ्या प्रमाणात अनुयायांनी राजगृहाकडे धाव घेतली होती. मात्र आंबेडकर परिवार आणि नेते यांनी अनुयायांना शांत राहण्याची सूचना केल्यानंतर अनुयायांनी आपापल्या परिसरातील पोलीस ठाण्यांना निवेदन देत आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याची मागणी सर्व स्तरातून करण्यात येत आहे.
“राजगृहावरील हल्ला आम्ही कदापि खपवून घेणार नाही. आरोपींना त्वरित अटक करून त्यांना कठोर शिक्षा करा. तसेच राजगृहावरील सुरक्षाव्यवस्था मातोश्रीच्या धर्तीवर वाढवा. आंबेडकर परिवाराला सुरक्षा प्रदान करा अशा मागणीचे निवेदन पत्र आम्ही पवई पोलीस ठाण्यात दिले आहे,” असे याबाबत बोलताना वंचित बहुजन आघाडीचे मुंबई प्रदेश सदस्य भारत हराळे यांनी सांगितले.
“अनुयायांमध्ये खूप राग आहे, मात्र या कोरोना काळात प्रशासनावर सुद्धा मोठा तणाव आहे. ज्याला पाहता आम्ही पवई पोलीस ठाणेला निवेदन देत आरोपींना अटक करून कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली आहे. मात्र, यानंतरही प्रशासनाने योग्य कारवाई केली नाही तर आमच्या नेत्यांच्या आदेशानुसार आम्ही पुढील पाऊले उचलू, असे याबाबत बोलताना संतोष गाडे यांनी सांगितले.
याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून मोठी कारवाई केली असल्याचे समोर येत असून, पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले असल्याची माहिती संयुक्त पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिली आहे.
No comments yet.