पवई परिसरात चोरांनी धुमाकूळ घातला असून, पवईतील तुंगागाव येथून एक मोटारसायकल तर रामबाग पवई येथून एक कार चोरी केल्याची घटना घडली आहे. याबाबत पवई पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, पवई पोलीस अधिक तपास करत आहेत.
कोरोना महामारीमुळे घरात बसून असलेल्या मुंबईकरांचा फायदा घेत चोरट्यांचा सुळसुळाट वाढलेला पाह्यला मिळत आहे. एकीकडे सायबर चोरट्यांनी तर दुसरीकडे घरात घुसून किंमती वस्तू चोरीच्या गुन्ह्यात सुद्धा वाढ झाली आहे. हे कमी कि काय म्हणून वाहन चोरांनी सुद्धा आता धुमाकूळ घातला आहे.
कोरोना विषाणूंच्या आगमनाने मुंबई लॉकडाऊन झाली आणि मुंबईतील गुन्हेगारी सुद्धा नाहीच्या प्रमाणावर पोहचली होती. मात्र काही दिवस विश्रांती घेतलेल्या या गुन्हेगारांनी पुन्हा आपले डोके वर काढायला सुरुवात केली आहे. पाठीमागील काही दिवसात पवई परिसरात चोरीचे गुन्हे वाढलेले पहायला मिळत आहेत.
“किरण सालकर हे आपल्या बहिणीबरोबर तुंगागाव, पवई येथे राहत असून, एका नामांकित कंपनीत कस्टमर केअर एक्झीक्युटीव्ह म्हणून काम करतात. त्यांच्याकडे असणारी बजाज कंपनीची पल्सर २०० मोटारसायकल (एमएच ०३ डीजे ०३७३) ते नेहमी आपल्या परिसरात असणाऱ्या लोढा इमारतीजवळ सार्वजनिक जागेत पार्क करून ठेवत. ११ जुलै रोजी संध्याकाळी ७ वाजता मी माझी मोटारसायकल नेहमीप्रमाणे ठरलेल्या जागी पार्क करून घरी गेलो. १५ जुलै रोजी मी दुपारी ०१ वाजण्याच्या सुमारास तिथे गेलो असता माझी मोटारसायकल तिथे नसल्याचे मला आढळून आले. मी आसपासच्या परिसरात शोध घेतला असता, ती मिळून आली नाही. असे पोलिसांना दिलेल्या जवाबात किरण यांनी म्हटले आहे.
मोटारसायकल चोरी झाली असल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी पवई पोलीस ठाण्यात धाव घेत याबाबत चोरीची तक्रार दाखल केली आहे.
रस्त्यावर पार्क केलेली कार पळवली
कोरोना महामारीला पाहता विनाकारण घराबाहेर पडणे अनेक नागरिक टाळत ते घरीच राहणे पसंत करत आहेत. यामुळे अनेक इमारती बाहेरील रस्त्यांवर वाहनेच वाहने पार्क केलेली पहायला मिळत आहेत. याचाच फायदा घेत चोरट्यांनी बरेच दिवस पार्क करून ठेवलेल्या कारवर डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे. पवई परिसरातील रामबाग भागात पवई पोलीस ठाण्यापासून ढेंगेच्या अंतरावर असणाऱ्या म्हाडा इमारतीत राहणाऱ्या एका डॉक्टर महिलेच्या वडिलांची इमारतीच्या बाहेर पार्क केलेली कार चोरट्यांनी पळवल्याची घटना जुलै महिन्यात घडली. यासंदर्भात त्यांनी पवई पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
“आम्ही कार चोरी झाल्याची माहिती मिळताच ठाण्यातील ज्या भागात या कारना बदलले जाते त्या भागात जावून सुद्धा शोधाशोध केली. मात्र कार मिळून आली नाही,” असे त्यांच्या एका मित्राने आवर्तन पवईशी बोलताना सांगितले.
“आम्ही आमच्या खबऱ्यांचे जाळे सक्रीय केले आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज सुद्धा मागवून तपास सुरु केला आहे. मात्र अनेक ठिकाणी प्रत्यक्ष इमारत भागात किंवा पार्किंग भागात कॅमेरे नाहीत, त्यामुळे सुगावा लागणे थोडे अवघड होत आहे.” असे याबाबत बोलताना पवई पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
आमचे फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लीक करा.
No comments yet.