पालिका निवडणुकीपूर्वी चांदिवलीत मोठा बदल; दोन माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

आगामी महापालिका निवडणुकीच्या आधीच चांदिवलीत मोठा फेरबदल पहायला मिळत आहे. चांदिवली (प्रभाग क्रमांक १५७) येथील माजी नगरसेवक ईश्वर तायडे आणि माजी नगरसेविका आकांक्षा शेट्ये यांच्यासह १०० हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. मंत्री आशिष शेलार आणि आमदार प्रविण दरेकर यांच्या उपस्थितीत नरीमन पॉइंट येथील भाजप प्रदेश कार्यालयात हा पक्ष प्रवेश पार पडला.

चांदिवलीतून ईश्वर तायडे हे दोन वेळा नगरसेवक तर आकांक्षा शेट्ये या एकवेळ नगरसेविका म्हणून निवडून आलेले आहेत. संघर्षनगर, चांदिवलीच्या सुरुवातीच्या विकासाच्या काळात त्यांचे मोठे योगदान आहे. संघर्षनगर भागात असणाऱ्या पाण्याच्या समस्येबाबत वारंवार पत्रव्यवहार करून देखील पालिकेतर्फे काहीच हालचाल केली जात नसल्याने २ दिवसापूर्वीच तायडे यांनी आमरण उपोषण केले होते. ज्यानंतर पालिका एल विभागाने लवकरच ही समस्या सोडवू असे त्यांना आश्वासन दिले आहे.

पक्ष प्रवेशानंतर बोलताना तायडे म्हणाले, “भारतीय जनता पक्षाचा मूलमंत्र ‘राष्ट्रप्रथम, पक्षद्वितीय, स्वतः तृतीय’ या विचारधारेशी एकरूप होत आज मी हा निर्णय घेत आहे. या पक्ष प्रवेशामुळे स्थानिक पातळीवर भाजपाचा संघटनात्मक पाया अधिक मजबूत होणार असून, स्थानिक विकासकामांना नक्कीच नवी दिशा व गती मिळेल.”

संघटनेकडून जी कोणती जबाबदारी दिली जाईल ती स्वीकारून आपला परिसर, विभाग आणि राष्ट्राचा विकास हेच माझे ध्येय असणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

मंत्री आशिष शेलार यावेळी बोलताना म्हणाले, मुंबईकर, मराठी माणूस, मुंबईचा विकास व देशहित यासोबत आम्ही एक टक्काही प्रतारणा करण्याचा मुद्दा नाही.

, , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!