जे करू नका सांगाल तेच आम्ही करू, अशा मानसिकतेचे काही लोक असतात असे म्हटले जाते. पवई येथील माता रमाबाई नगर भागात असेच काही सध्या पहायला मिळत आहे. पालिकेच्या ‘येथे कचरा टाकू नका’ सूचना फलकासमोरच काही नागरिक मुद्दाम कचरा टाकत आहेत. काहीच महिन्यांपूर्वी येथील तरुणांनी या परिसरात स्वच्छता मोहीम राबवत येथील भागाला रंगरंगोटी करून आकर्षक रूप दिले होते.
ऐन पावसाळ्यात या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली तर आहेच शिवाय यामुळे परिसरात रोगराई पसरत असल्याचे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे.
ते पुढे म्हणाले, या भागात इमारती आणि चाळ सदृश्य वस्त्या असे दोन्ही रहिवाशी भाग आहेत. रात्रीच्या अंधारात नागरिक येवून कचरा टाकून जात असतात. आसपासच्या परिसरात राहणारे लोक कामावर जाताना, मुलांना शाळेत सोडायला जाताना येवून या भागात कचरा फेकून जातात. दुसऱ्या दिवशी कचऱ्याची गाडी येऊन कचरा उचलून जाईपर्यंत कचरा तिथेच पडून असतो.
“आता पावसाळ्याचे दिवस असल्याने पावसाच्या पाण्यासोबत कचरा संपूर्ण रस्त्यावर पसरलेला असतो. येथून काही मीटर अंतरावर एक खाजगी आणि एक पालिकेची शाळा आहे. या शाळेतील विध्यार्थ्यांना या संपूर्ण घाणीतूनच प्रवास करावा लागतो.” असे यासंदर्भात बोलताना अजून एका नागरिकाने सांगितले.
एकीकडे चांदिवली, संघर्षभागात कचऱ्याच्या समस्येबाबत चांदिवली रहिवाशी संघटनेने आवाज उठवल्यानंतर पालिका एल विभागाने हलगर्जी करणाऱ्या कचरा संकलन संस्था आणि स्वच्छता कर्मचारी यांच्यावर कारवाईचा बडगा उचलला आहे. तिथे दुसरीकडे पालिकेच्या येथे ‘कचरा टाकू नका’ सूचना फलकालाच कचऱ्याची टोपली दाखवत कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर आणि याची विल्हेवाट लावण्यास सक्षम नसणाऱ्या संस्थांवर कारवाई का केली जात नाही? असा प्रश्न या परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
No comments yet.