डिजिटल फसवणुकीच्या एका प्रकरणात, पवई पोलिसांनी एका अज्ञात सायबरस्टॉकरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पवईस्थित ऑस्ट्रेलियात शिकणाऱ्या २३ वर्षीय मुलीला लक्ष्य करण्यासाठी तिच्याच आईच्या नावाने बनावट स्नॅपचॅट अकाउंट तयार केले होते.
विद्यार्थिनीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, स्टॉकरने तिचे फोटो आणि कुटुंबाच्या तपशीलांचा वापर करून स्नॅपचॅटवर एक बनावट प्रोफाइल तयार केले. विद्यार्थिनीला या खात्यावरून मैत्रीची विनंती (फ्रेंड रिक्वेस्ट) मिळाल्यावर तिच्या आईचे अकाउंट असल्याचे समजून, फेब्रुवारीमध्ये विद्यार्थिनीने फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली.
काही दिवस या बनावट प्रोफाईलच्या माध्यमातून लक्ष ठेवून असणाऱ्या स्टॉकरने ५ फेब्रुवारी रोजी विद्यार्थिनीचा मॉर्फ केलेल्या अश्लील प्रतिमा पाठवल्या. या प्रतिमा सोशलमाध्यमांवर टाकण्याची आणि तिच्या नातेवाईकांना पाठवण्याची धमकी देत ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. या प्रकाराने घाबरलेल्या विद्यार्थिनीला ती सापळ्यात अडकली असल्याचे लक्षात येताच तिने घरी तिच्या आईला यासंदर्भात कळवले.
पवई येथे राहणाऱ्या विद्यार्थिनीच्या आईने पवई पोलिसांकडे धाव घेत आक्षेपार्ह संदेश पाठवणे आणि धमकी देणे, ब्लॅकमेल करणे या आरोपाखाली माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांना संशय आहे की आरोपी हा अनोळखी नसावा. “आरोपी हा मुलगी आणि तिच्या परिवाराला चांगले ओळखत असावा. आरोपीचा शोध घेण्यासाठी आम्ही स्नॅपचॅटकडे तांत्रिक तपशील मागितले आहेत,” असे तापसी अधिकाऱ्याने सांगितले.



No comments yet.