
प्रातिनिधिक छायाचित्र
पवई येथील एका डॉक्टरला शेअर ट्रेडिंग योजनेत गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबई पोलिसांच्या पश्चिम सायबर सेलने पवई येथील ७९ वर्षीय डॉक्टरला शेअर ट्रेडिंग योजनेत गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या सायबर फसवणुकीप्रकरणी दोघांना अटक केली आहे.
रिचर्ड राव आणि प्रशांत चौधरी असे अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे असून, रविवारी डोंबिवली परिसरातून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन आरोपींनी मुख्य आरोपीला अनेक बँक खाती उपलब्ध करून दिली होती, ज्यांचा वापर फसवणुकीचे पैसे मिळवण्यासाठी केला जात होता. “दोघांना त्यांच्या बँक खात्यात पैसे मिळाल्यानंतर त्यांनी ते पैसे काढले आणि कमिशन घेतल्यानंतर त्यांनी उर्वरित रक्कम फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला दिले आहेत”, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
पोलिसांच्या माहितीनुसार, फसवणुकीला बळी पडलेले ज्येष्ठ डॉक्टर हे पवईतील हिरानंदानी भागात राहतात. त्यांची एक खाजगी फर्म देखील आहे. १७ जुलै रोजी त्यांना शेअर बाजारातील गुंतवणुकीबद्दल व्हॉट्सअॅपवर एक प्रचारात्मक संदेश प्राप्त झाला होता. याबद्दल रस दाखवताच त्यांना एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जोडण्यात आले, ज्यामध्ये सदस्यांनी शेअर ट्रेडिंगमधून मोठ्या नफ्याचा दावा करणारे स्क्रीनशॉट पोस्ट केले होते.
दोन-तीन दिवसानंतर, तक्रारदार यांना एका व्यक्तीचा फोन आला ज्याने त्यांना शेअर बाजारात एका विशिष्ट स्टॉकमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळवू शकेल असे सांगितले. “उच्च परताव्याचे आशेने तक्रारदाराने त्यांची कागदपत्रे शेअर केली आणि त्यांच्या नावावर एक व्हर्च्युअल ट्रेडिंग अकाउंट उघडण्यात आले. पुढच्या आठवड्यात, त्यांनी ₹२५ लाख गुंतवले आणि त्यांना प्रभावी नफा दाखवला गेला. मात्र जेव्हा त्यांनी यातील काही रक्कम काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते तसे करू शकले नाहीत,” असे पोलिसांनी सांगितले.
“त्यांनी अॅडमिनशी याबाबत संपर्क साधला असता पैसे मिळवण्यासाठी त्यांना यासाठी अधिक पैसे देण्याचा सल्ला देण्यात आला. यावरून आपली फसवणूक झाल्याचा त्यांना संशय आला. काही वेळातच त्यांना ब्लॉक करण्यात आले आणि त्याचे व्हर्च्युअल अकाउंट देखील गायब करण्यात आले,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
याबाबत डॉक्टरांनी सायबर पोलिस स्टेशनशी संपर्क साधत ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तक्रार दाखल केली होती. व्यवहाराच्या तपशीलांच्या आधारे, सायबर पोलीस तपास अधिकाऱ्यांनी आरोपींचा मागमूस काढत या प्रकरणात पैशांचा व्यवहार करणाऱ्या दोन आरोपींना डोंबिवली मधून शोधून काढले आणि अटक केली. पुढील तपास सुरू आहे.



No comments yet.