गणेश विसर्जनासाठी हिरानंदानी संकुलात कृत्रिम तलाव

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या … असा जयघोष करत मुंबई, ठाण्यासह राज्यभर दीड दिवसांच्या घरगुती गणपती बाप्पांचं गुरुवारी विसर्जन पार पडले. मुंबई महापालिकेच्या २८८ प्रभागांमध्ये गणरायाच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत.

पवईमध्ये पवई तलाव भागात प्रत्येकवर्षी मोठ्या उत्साहात गणेश विसर्जन पार पडत असते. मात्र यावर्षी या भागातील खास आकर्षण ठरत आहे ते हिरानंदानी संकुल भागात गणेश विसर्जनासाठी बनवण्यात आलेला कृत्रिम तलाव. पहिल्याच दिवशी दीड दिवसाच्या जवळपास २०० गणेश मूर्तींचे विसर्जन या तलावात करण्यात आले.

हिचकी रेस्टॉरंटच्या बाजूच्या पालिका पार्किंगमध्ये हा कृत्रिम तलाव पालिकेतर्फे आणि सांस्कृतिक परंपरा आणि पर्यावरण रक्षणासाठी सतत पुढाकार घेणारे चांदिवली विधानसभेचे आमदार दिलीप (मामा) लांडे यांच्या संकल्पनेतून बनवण्यात आला आहे. विभागातील घरगुती गणपतीचे विसर्जन या ठिकाणी केले जाणार आहे. पालिका पार्किंगच्या २००० चौरस फूट जागेत ७ फूट खोली असलेला हा तलाव बांधण्यात आला आहे.

गणेश उत्सवाच्या काळात पवई तलाव भागात विसर्जनाच्या दिवशी मुख्य गणेशघाट आणि गणेशनगर गणेशघाट या ठिकाणी हजारोंच्या संख्येने लहानमोठ्या गणेशांचे विसर्जन केले जाते. एवढ्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या विसर्जनामुळे व्यवस्थेवर दबाव निर्माण होत असतानाच तलावात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याचा दावा पर्यावरण प्रेमी करत असतात. यावर उपाय म्हणूनच पालिकेतर्फे २८८ प्रभागात पाठीमागील काही वर्षांपासून ठीकठिकाणी कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत.

विसर्जनाच्या दिवशी हिरानंदानी भागात देखील असाच एक कृत्रिम तलाव असावा अशी मागणी येथील स्थानिकांनी केली होती. या मागणीचा विचार करत स्थानिक आमदार दिलीप लांडे यांच्या प्रयत्नातून पालिकेतर्फे अखेर हिरानंदानी येथे कृत्रिम तलाव बनवण्यात आला आहे.

पालिका एस विभागातील अधिकारी श्रीमती ससाणे, सहाय्यक अभियंता राहुल जाधव आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या सहकार्याने हा कृत्रिम तलाव तयार करण्यात आला आहे, पालिकेचे सुसज्ज नियोजन आणि अंमलबजावणीमुळे या परिसरातील भक्तांसाठी एक मोठी सुविधा या परिसरात तयार झाली आहे. सोबतच पवई तलावासारख्या नैसर्गिक जलसाठ्यांवरील पर्यावरणीय दबाव कमी झाला आहे.

या ठिकाणी विसर्जनासाठी आलेल्या गणेश भक्तांनी आनंद व्यक्त करतानाच या तलावामुळे आपल्या बाप्पाला भाविकांना मूर्ती विसर्जनासाठी सुरक्षित, सोयीस्कर आणि पर्यावरणपूरक पर्याय मिळाला असल्याचे समाधान व्यक्त केले.

पर्यावरण प्रेमींनी देखील हिरानंदानी येथील कृत्रिम तलावाचे स्वागत केले आहे. हे पवई तलावाच्या संरक्षणासाठी एक सकारात्मक पाऊल असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

यासंदर्भात बोलताना आमदार लांडे यांनी या विभागातील लोकांना त्यांच्या गणेश मूर्ती या कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचे आवाहन करतानाच निसर्ग रक्षणासाठी आपला सहभाग देण्याचे आवाहन केले आहे.

, , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!