ज्येष्ठ नागरिकाच्या घरात घरफोडी करून सोन्याचे दागिने लांबवणारी महिला पवई पोलिसांच्या जाळ्यात; ₹३.५७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बंद घरातून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या महिला आरोपीस अटक करण्यात पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आले आहे. पोलिसांनी या कारवाई दरम्यान आरोपीकडून ₹३,५७,०००/-  किंमतीचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

तक्रारदार सेवानिवृत्त शिक्षिका ज्योती खंबाटा (वय ७० वर्षे) पवई पोलिसांच्या हद्दीतील ट्युलिप पार्क हाऊसिंग सोसायटीमध्ये राहतात. ०४ ऑगस्ट रोजी दुपारी १२.०० ते १३.३० वाजण्याच्या सुमारास, घर बंद असताना एका अज्ञात इसमाने दरवाजाचे कुलूप कुठल्यातरी साधनांच्या साहाय्याने उघडून आत प्रवेश करून, घरातून ₹३,२२,०००/- किंमतीचे सोन्याचे दागिने चोरी केले होते.

याप्रकरणी फिर्यादी ज्योती खंबाटा यांच्या तक्रारीवरून पवई पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५(अ) आणि ३३१(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सीसीटीव्ही आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास

दाखल गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे वेगाने फिरवली. घटनास्थळ आणि आरोपीच्या येण्या-जाण्याच्या मार्गावरील तब्बल १५ ते २० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तांत्रिक पथकाकडून अत्यंत बारकाईने तपासण्यात आले. या फुटेजच्या विश्लेषणादरम्यान एका संशयित महिलेची हालचाल दिसून आली आणि तिची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले.

“सदर संशयित महिला तिच्या राहत्या परिसरातच वावरत असल्याची अत्यंत गोपनीय माहिती आम्हाला प्राप्त झाली होती, या माहितीच्या आधारे पथकाने तत्परतेने सापळा रचून अत्यंत शिताफीने या महिलेला ताब्यात घेतले. तिच्याकडे केलेल्या चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली देतानाच चोरीचा मुद्देमाल विविध ठिकाणी लपवून ठेवला असल्याचे सांगितले,” असे पवई पोलिसांच्या तपासी अधिकाऱ्याने सांगितले.

अनु विकी बोथ (वय ३२ वर्षे, व्यवसाय – साफसफाई) असे अटक करण्यात आलेल्या महिला आरोपीचे नाव आहे. तिच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची (क्रिमिनल रेकॉर्ड) तपासणी केली असता तिचा अभिलेख निरंक असल्याचे निष्पन्न झाले आहे.

मुद्देमालाची अत्यंत अनपेक्षित ठिकाणी लपवाछपवी

आरोपीकडे कसून आणि सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीत तिने चोरी केलेल्या दागिन्यांपैकी काही दागिने वेगवेगळ्या सोनारांना विकल्याचे आणि काही दागिने तिची परिचित महिला शकुंतला बुडथापा (वय ५२ वर्षे) हिच्याकडे ठेवण्यास दिल्याचे कबूल केले. त्यानुसार पथकाने पंचांसमक्ष कायदेशीर प्रक्रिया पार पाडून हे दागिने जप्त केले.

तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली, काही सोन्याचे दागिने तिने संबंधित सोसायटीतील पुरुषांच्या वॉशरूममधील आरशाच्या पाठीमागे सुरक्षितपणे लपवून ठेवले होते. पंचांसमक्ष विधिवत पंचनामा करून तेथून सर्व उर्वरित सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

“तपासादरम्यान पोलिसांना एकूण ₹३,५७,००० किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पूर्ण यश आले आहे. यामध्ये सोन्याची चैन, सोन्याच्या लगडी, सोन्याची अंगठी, सोन्याचे लॉकेट आणि कर्णफुले अशा मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे,” असे पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत यांनी सांगितले.

पोलीस उप आयुक्त (पश्चिम परिमंडळ-०३) दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (साकीनाका विभाग), वरिष्ठ पोलीस निरीक्षक (पवई पोलीस) आत्माजी सावंत आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुशांत बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नवनाथ ढेकळे, पोलीस उपनिरीक्षक अमृता खाडे, पोलीस अंमलदार सुरनर, चव्हाण, वारंग, राठोड, शिरसाट, घाडगे यांच्या पथकाने पार पाडली. तांत्रिक तपासासाठी विशाल पिसाळ यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

, , , , , , , , , , , , ,

No comments yet.

Leave a Reply

Powered by WordPress. Designed by WooThemes

error: Content is protected !!